Sangli- पुनवतमध्ये हिंदकेसरी आंधळकर यांचे स्मारक उभारावे, कुस्तीप्रेमींची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:45 PM2023-03-30T18:45:13+5:302023-03-30T18:47:04+5:30

महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका हिंदकेसरी गणपतराव आंधळकर (आबा) यांनी सातासमुद्रापार पोहाेचविला

A memorial to Hindkesari Andhalkar should be erected in Punwat Sangli | Sangli- पुनवतमध्ये हिंदकेसरी आंधळकर यांचे स्मारक उभारावे, कुस्तीप्रेमींची मागणी 

Sangli- पुनवतमध्ये हिंदकेसरी आंधळकर यांचे स्मारक उभारावे, कुस्तीप्रेमींची मागणी 

googlenewsNext

विकास शहा

शिराळा : महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका हिंदकेसरी गणपतराव आंधळकर (आबा) यांनी सातासमुद्रापार पोहाेचविला. देश-विदेशातील पहिलवानांना चारीमुंड्या चीत करीत नाव कमावले. एक आदर्श कुस्तीपटू, आदर्श वस्ताद तसेच आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव आंधळकरांचे स्मारक व त्यांच्या कारकिर्दीचा इतिहास सांगणारे वास्तुसंग्रहालय पुनवत (ता. शिराळा) येथे त्यांच्या जन्मभूमीत साकारावे, अशी मागणी कुस्तीप्रेमींमधून हाेत आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात गेले. अपार कष्ट केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी हाेत देदीप्यमान कामगिरी बजावली. १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव अशा नामवंत मल्लांसाेबतच्या त्यांच्या लढती गाजल्या. 

१९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्वही त्यांनी केले. या स्पर्धेत त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा या महान खेळाडूचे स्मारक त्यांच्याच मूळ गावी पुनवत येथे असावे, असे त्यांचे पुतणे दत्ता आंधळकर यांनी  सांगितले.

कुस्ती क्षेत्राशी निगडित असणारे शिराळा तालुक्यातील पुनवत हे महान मल्ल तमाम पहिलवानांचे दैवत हिंदकेसरी गणपतराव आंधळकर (आबा) यांचे गाव आहे. आयुष्यभर कुस्ती आणि लाल मातीची सेवा करणारा, कधीही कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करणारा, गणपतराव आबांसारखा देखणा पहिलवान पुन्हा महाराष्ट्राला मिळणार नाही. ही कीर्ती कायम ठेवण्यासाठी आबांच्या मूळ गावी त्यांचे स्मारक व्हावे. - चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी
 

हिंदकेसरी गणपतराव आंधळकर यांनी अटकेपार झेंडा रोवला. देशाचे, गावाचे, राज्याचे नाव मोठे केले. ‘कुस्तीगिरांचा पांडुरंग’ असा लाैकिक असलेल्या या महान मल्लाचे स्मारक होणं गरजेचं आहे. शासनाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. - रामदास देसाई, संस्थापक, कुस्ती हेच जीवन, महाराष्ट्र राज्य

Web Title: A memorial to Hindkesari Andhalkar should be erected in Punwat Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.