Sangli Crime: एका मुलीशी थांबला होता बोलत, अपहरण करुन अल्पवयीन मुलास केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:11 PM2023-02-09T13:11:08+5:302023-02-09T13:11:35+5:30
मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाने शेडचा दरवाजा तोडून स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी परतला
इस्लामपूर : प्रेमसंबंधाच्या कारणातून एका १७ वर्षीय मुलास मुलीसोबत बोलत थांबलेल्या शाळेसमोरून दुचाकीवरून अपहरण करत जनावरांच्या शेडमध्ये कोंडून काठी आणि कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्याला शेडमध्ये कोंडून ठेवत मोबाइल काढून घेऊन हल्लेखोर निघून गेला. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला.
या मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश पाटील (पूर्ण नाव आणि पत्ता नाही) याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करण्यासह अपहरण, जबरी चोरी, ओलीस ठेवणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अल्पवयीन मुलगा हा एका मुलीशी शाळेजवळ बोलत थांबला होता. ही बाब मुलीच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आल्यावर मुलीने तेथून लगत असणाऱ्या बोळातून पळ काढला. त्याचवेळी पळून जात असलेल्या या मुलास गणेश पाटील याने थांबवून दुचाकीवर घेतले. एका जनावरांच्या शेडवर नेले. त्यास शेडमध्ये कोंडून काठी आणि कुऱ्हाडीने डोक्यात, उजव्या खांद्यावर, पायावर, उजव्या हाताच्या कोपरावर आतील बाजूस आणि पाठीवर मारहाण करीत जखमी केले. त्याला शेडमध्येच कोंडून त्याच्याजवळ असलेला मोबाइल काढून घेऊन तेथून तो निघून गेला.
मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाने शेडचा दरवाजा तोडून स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी परतला. घडलेला प्रकार त्याने आई-वडिलांना सांगितला. सध्या त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातच पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. प्रभारी पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम या पुढील तपास करीत आहेत.