धक्कादायक! अभ्यासासाठी मोबाईल दिला, अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलाने बालिकेवर अत्याचार केला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 05:57 PM2023-04-11T17:57:33+5:302023-04-11T17:57:54+5:30
मुलीच्या आईने मुलाच्या घरी हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी आपल्या मुलाचा संबंध नसल्याचे सांगत हात वर केले. वैद्यकीय तपासणी केली असता सर्वच स्पष्ट झाले
आष्टा : वाळवा तालुक्यातील एका गावात नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने घराशेजारी राहणाऱ्या साडेचार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. १)ला घडली.
आष्टा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या वाळवा तालुक्यातील एका गावात संबंधित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा व पीडित बालिकेचे कुटुंब शेजारी राहते. भावकीतील कुटुंब असल्याने दाेन्ही कुटुंबांचा दैनंदिन संपर्क असताे. शनिवारी (दि. १) सकाळी दहाच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलाने पीडित बालिकेला शेजारच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने आईला माहिती दिली.
त्यानंतर मुलीच्या आईने मुलाच्या घरी हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी आपल्या मुलाचा संबंध नसल्याचे सांगत हात वर केले. त्यामुळे बालिकेच्या आईने आष्टा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित मुलगा व बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलाने बालिकेवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित अल्पवयीन मुलास सांगली येथील बालगुन्हेगार न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यास गावात राहण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे त्याला अन्य नातेवाईकांकडे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आप्पासाहेब बाबर करत आहेत.
याबाबत सहाय्यक निरीक्षक आप्पासाहेब बाबर म्हणाले, संबंधित मुलाच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची आहे. अभ्यासासाठी त्याला मोबाईल देण्यात आला हाेता. मात्र, अभ्यास करताना अश्लील व्हिडिओ पाहून त्याने बालिकेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
कठाेर कारवाईची गरज
मोबाईलचा अतिवापर, गांजा व इतर व्यसनांमुळे अल्पवयीन मुले छेडछाडीसह अन्य गैरकृत्ये करताना सापडत आहेत. संबधित गावात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. संबंधितांनी बदनामीच्या भीतीने तक्रारी दिल्या नाहीत. त्यातूनच गैरकृत्ये वाढत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी गांधारीची भूमिका न घेता कडक कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.