प्रियकराच्या मदतीने आईनेच केली पोटच्या चिमुकल्याची हत्या, सांगलीतील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 11:38 AM2023-05-09T11:38:42+5:302023-05-09T11:39:01+5:30
हत्या करुन चिमुकल्यास विहिरीत फेकले, अनैतिक संबंधास अडसर ठरल्याने कृत्य
दिलीप मोहिते
विटा : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या स्वत:च्या पोटच्या ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला प्रियकराच्या मदतीने विहीरीत फेकून त्याची हत्या केल्याची घटना आज, मंगळवारी (दि.९) सकाळी लेंगरे (ता.खानापूर) येथे उघडकीस आली. शौर्य प्रकाश लोंढे (वय ६) असे हत्या झालेल्या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे.
याप्रकरणी त्याची आई ज्योती प्रकाश लोंढे (वय २८, रा. लेंगरे) व तिचा प्रियकर रूपेश नामदेव घाडगे (वय २५, रा. जोंधळखिंडी, ता.खानापूर) या दोघांना विटा पोलीसांनी अटक केली आहे. या संतापजनक घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लेंगरे येथील ज्योती लोंढे व जोंधळखिंडी येथील रूपेश घाडगे यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यांना विवाह करायचा होता. परंतु, ज्योती हिचा ६ वर्षाचा मुलगा शौर्य हा अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी त्याच्यातील हा अडथळा दूर करण्यासाठी चिमुकल्या शौर्य याचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार या दोघांनी कारस्थान रचले.
प्रियकर रूपेश याने प्रेयसी ज्योतीच्या मदतीने दि. ६ मे रोजी शौर्य याला दुचाकीवर नेऊन ढोराळे रस्त्यावर आडरानात असलेल्या विहीरीतील पाण्यात शौर्यला फेकून दिले. त्यानंतर सायंकाळी शौर्य हा बेपत्ता झाला असून त्याचे अपहरण झाल्याची तक्रार ज्योती हिने विटा पोलीसांत दिली.
त्यानुसार पोलीस तपास सुरू असताना पोलीसांना शौर्य याचा मृतदेह ढोराळे रस्त्यावरील आडरानातील विहीरीच्या पाण्यावर तरगंत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीपाद यादव, उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शौर्यचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढला.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीसांना शौर्यची आई ज्योती व प्रियकर रूपेश यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. यावेळी पोलीसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता अनैतिक संबंधास व विवाहाला अडसर ठरत असल्याचे आम्हीच शौर्य याला विहीरीत फेकून देऊन त्याचा कायमचा काटा काढल्याचे पोलीसांत कबुली दिली.
या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरीकांत संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याप्रकरणी ज्योती लोंढे व तिचा प्रियकर रूपेश घाडगे याला पोलीसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे पुढील तपास करीत आहेत.