Sangli: विवाहितेस यात्रेला पाठविण्यावरून वाद; भाच्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:30 PM2024-04-18T18:30:47+5:302024-04-18T18:31:32+5:30
अथणी तालुक्यातील मलाबाद येथील घटना : मृत तरुण जत तालुक्यातील संखचा
दरीबडची/अथणी : मलाबाद (ता. अथणी) येथे मावशीला माहेरच्या यात्रेस नेण्यासाठी आलेल्या भाच्याचा सासरच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. गौडेश अर्जुन बालगाव (वय २१, रा. संख, ता. जत), असे मृताचे नाव आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत दाेन्ही कुटुंबांतील चाैघे जखमी झाले आहेत. मंगळवारी ही घटना घडली. याप्रकरणी अथणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संख येथील काशीनाथ रामगोंडा हगलंबी यांच्या बहिणीचा विवाह मलाबाद (ता. अथणी) येथील प्रकाश जडप्पा चौगुला यांच्याशी झाला आहे. संख येथे श्रीशैल मल्लिकार्जुन देवाची यात्रा आहे. यात्रेनिमित्त त्यांचा चुलत भाऊ दयानंद बसगोंडा हगलंबी व मोठ्या बहिणीचा मुलगा गौडेश बालगाव हे दाेघे मलाबाद येथे श्रीशैल मल्लिकार्जुन देवाचे सूप देण्यासाठी गेले होते. सूप दिल्यानंतर गावच्या आयदेशी यात्रेला बहिणीने येण्याचा रिवाज आहे. यात्रेत बहिणीने भावाला अहेर करण्याची प्रथा आहे.
यात्रा असल्याने ‘मुलीला माहेरी पाठवा’ अशी विनंती दयानंद हगलंबी व गाैडेश बालगाव यांनी सासरच्या नातेवाइकांना केली; परंतु अगोदरच दाेन्ही कुटुंबांत भांडण असल्याने त्यांच्यामध्ये वादावादी झाली. अशोक जडप्पा चौगुला व प्रकाश जडाप्पा चौगुला यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांना बेदम मारहाण केली.
हा प्रकार दयानंद हगलंबी यांनी संख येथील नातेवाइकांना फोनवरून कळवला. यानंतर संख येथून त्यांचे अन्य काही नातेवाईक दुचाकीवरून मारहाणीचा जाब विचारण्यासाठी मलाबादला पाेहाेचले. रात्री उशिरा त्यांच्यामध्ये पुन्हा वादावादी झाली. वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. अंधारात कोण कुणाला मारतोय हेही समजत नव्हते. यावेळी चाैगुला कुटुंबीयांनी धारदार हत्याराने गौडेश बालगाव, काशीनाथ हगलंबी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.
दाेघांनाही उपचारासाठी जतला नेत असताना वाटेतच गाैडेशचा मृत्यू झाला. भुताळसिद्ध रामगोंडा हगलंबी (वय ३१), काशीनाथ रामगोंडा हगलंबी (वय ४०, रा. दोघे संख) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. काशीनाथ हगलंबी यांची प्रकृती चिंताजनक आहे. मारहाणीत मलाबाद येथील अशोक जडप्पा चौगुले व प्रकाश जडाप्पा चौगुला हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत अथणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस निरीक्षक रवींद्र नायकवडी, उपनिरीक्षक शिवानंद कारजोल तपास करीत आहेत.