एसटी खासगीकरणाचा नवा अध्याय सुरु होणार, सांगलीत भाडेतत्त्वावर शंभर बसेस येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:08 PM2022-06-20T17:08:11+5:302022-06-20T17:09:30+5:30
भाडेतत्त्वावरील बसेससोबत संबंधित कंत्राटदाराचे चालकही येणार असल्याने एसटीच्या १५० ते २०० चालकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे.
अशोक डोंबाळे
सांगली : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) तोटा कमी करण्याकरिता सांगली विभागासाठी शंभर खासगी साध्या बसेस भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची निविदा महामंडळाने प्रसिद्ध केल्यामुळे ‘लालपरी’ची वाटचाल खासगीकरणाकडे सुरू झाल्याचे दिसत आहे. भाडेतत्त्वावरील बसेससोबत संबंधित कंत्राटदाराचे चालकही येणार असल्याने एसटीच्या १५० ते २०० चालकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे.
तासगाव, विटा, जत आणि कवठेमहांकाळ आगारांना साध्या (लाल रंगाच्या) १०० बसेस मिळणार आहेत. या भाडेतत्त्वावरील बसेसची निविदा एसटी महामंडळाने प्रसिद्ध केली आहे. महिनाभरात ही सर्व प्रक्रिया राबविल्यानंतर दोन महिन्यात भाडेतत्त्वावरील बसेस दाखल होणार आहेत. सांगली विभागाकडे ६५० गाड्या असून आता साध्या प्रकारातील १०० बसेस येणार आहेत. त्याचे काम एका कंपनीला दिल्याची माहिती मिळाली.
साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा एसटीचा हा पहिला निर्णय आहे. भाडेतत्त्वावरील बसेससोबत संबंधित कंत्राटदाराचे चालकही येणार असल्याने एसटीकडील चालकांच्या नोकऱ्या संपणार आहेत. हे चित्र असेच राहिल्यास आगामी दोन वर्षांत एसटीचे शंभर टक्के खासगीकरण होईल, अशी भीती कर्माचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.
चालक खासगी कंत्राटदाराचा
या बसेस सात वर्षांकरिता भाडेतत्त्वावर असतील. त्यावर चालक खासगी कंत्राटदाराचा व वाहक एसटीचा असेल. एसटीकडे काही भाडेतत्त्वावरील शिवनेरी, शिवशाही बसेसही असून त्यावर चालक कंत्राटदाराचा आहे. आता भाडेतत्त्वावर साध्या बसेसही घेण्यात येत असून त्यावरील चालक खासगी कंत्राटदाराचा असेल.
अशी असणार भाडेतत्त्वावरील लालपरी
भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये टू बाय टू, आरामदायी पुश बॅक आसनव्यवस्था असेल. त्याची रंगसंगतीही आकर्षक असेल. सध्या एसटीकडे ११ मीटर लांबीच्या बसेस आहेत. येणारी नवीन साधी बस १२ मीटर लांबीची असून वावरण्यासाठीही काहीशी मोकळी जागा असेल, असे सांगण्यात आले.
या आगारांना मिळणार खासगी बसेस
आगार - बसेस संख्या
तासगाव - २४
विटा - ३२
जत - २३
क.महांकाळ - २१
एकूण - १००