Crime News miraj: फसवणुकीचा नवा फंडा; तरुणीचे लग्न लावून साडेतीन लाखांचे दागिने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:36 PM2022-06-15T12:36:01+5:302022-06-15T12:39:38+5:30
या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची दिली धमकी
मिरज : मिरजेत तरुणीचे लग्न लावून साडेतीन लाखांचे दागिने लुटल्याबद्दल म्हाडा कॉलनीतील सारिका अमित शिंदे या महिलेविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारिका शिंदे ही महिला म्हाडा काॅलनीत किराणा दुकान व वधू-वर सूचक मंडळ चालवते. म्हाडा कॉलनीतील आशा वाघमारे यांची मुलगी प्रिया हिचा विवाह गोवा येथील शशांक सावंत यांच्याशी ठरवून मध्यस्थी करून सावंत यांच्याकडून कमिशन म्हणून तिने एक लाख रुपये घेतले. महिन्याभरापूर्वी वाघमारे यांच्या मुलीचा विवाह गोवा येथे झाल्यानंतर लग्नात आलेली अहेराची ७० हजार रुपये रक्कम काढून घेतली.
त्यानंतर मुलीच्या सासऱ्यांना विनंती करून प्रिया हिला घरी भोजनास बोलावले. प्रिया व तिच्या आईस घरात एक दिवस मुक्काम करण्याचा आग्रह केला. दोघी तेथे राहिल्यानंतर मुलीची आई आशा वाघमारे यांना थोबाडीत मारून खाली पाडले. प्रिया हीस मारहाण करून संसार मोडण्याची धमकी देऊन सासरच्या मंडळींनी घातलेले अंगठ्या, गंठण, बांगड्या, पाटल्या, नेकलेस, चेन असे ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे आठ तोळे सोने जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत प्रिया शशांक सावंत (रा. गोवा) हिने मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जबरदस्तीने साडेतीन लाखांचे दागिने काढून घेतल्याबद्दल सारिका अमित शिंदे (वय ३५, रा. म्हाडा काॅलनी) हिच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मारहाण व खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.