सांगलीतील कार्यकर्त्यांचा अपक्ष खासदार निवडीचा नवा पॅटर्न
By हणमंत पाटील | Published: June 11, 2024 05:02 PM2024-06-11T17:02:39+5:302024-06-11T17:03:13+5:30
प्रस्थापित नेत्यांना धडा
हणमंत पाटील
सांगली : राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या दोन तुल्यबळ पहेलवान उमेदवारांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पराभवाचे अस्मान दाखविले. त्यामध्ये विशाल पाटील यांच्यापेक्षा त्यांना निवडणूक रिंगणात उतरायला लावून निवडून आणण्याचे श्रेय कार्यकर्त्यांचे आहे.
सांगलीतील भाजपचे उमेदवार संजय पाटील हे तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रिक करण्याच्या तयारीत होते. परंतु, भाजपचे तीन आमदार व पदाधिकाऱ्यांचा त्यांना तिसऱ्यांदा तिकीट देण्यास विरोध होता. तरीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गृहीत धरून पक्षश्रेष्ठींनी पुन्हा त्यांनाच तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी उघडपणे विरोध करीत अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. तसेच, नाराज भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही अपक्षाला छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. जशी नाराजी महायुतीच्या उमेदवारीवरून होती. तशीच नाराजी महाविकास आघाडीच्या उमेदवारीविषयी होती.
जिल्ह्यात उद्धवसेनेची ताकद नसतानाही महाविकास आघाडीची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना देण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही पक्षाला उमेदवारी नाकारली. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेससाठी हा विषय अस्तित्वाचा व अस्मितेचा झाला. त्यानिमित्ताने गटतट बाजूला ठेवून जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते पहिल्यांदाच एकवटले. अन् काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा गृहीत धरून विशाल यांना बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडले.
वंचित आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या एका सभेचा अपवाद वगळता कोणत्याही दिग्गज नेत्यांची सभा अपक्ष उमेदवारीसाठी झाली नाही. दुसऱ्या बाजूला मात्र महायुतीचे उमेदवार संजयकाका यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सभा झाल्या. तर महविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जाहीर सभा झाल्या. सांगलीकरानी प्रत्येक सभेला गर्दी केली. पण निवडणुकीत अपक्ष उमेदवारालाच कौल दिला.
प्रस्थापित नेत्यांना धडा
आपल्या राजकीय पक्षातील श्रेष्ठी व प्रस्थापित नेत्यांना धडा शिकविण्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी कुठे उघड, तर कुठे छुपा पाठिंबा अपक्ष उमेदवाराला दिला. सांगलीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेऊन ती जिंकेपर्यंत दिवसरात्र प्रचार केला. जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतही अपक्ष उमेदवाराला मताधिक्य दिले. त्यामुळे अपक्ष विशाल पाटील हे एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. अन् आम्हाला नेत्यांनी गृहीत धरू नये, हा संदेश सांगलीकर मतदार व कार्यकर्त्यांच्या नव्या पॅटर्नने दिला आहे.