इस्लामपुरात ट्रकच्या चाकाखाली सापडून नऊ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, ट्रकचालकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 12:52 PM2022-06-06T12:52:27+5:302022-06-06T12:52:53+5:30

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी निरंजनची ओळख पटत नव्हती. शेवटी त्याच्या कपडे आणि सायकलवरून त्याची ओळख पटली. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी फोडलेल्या हंबरड्याने सगळा परिसर हळहळला

A nine-year-old boy was found dead under the wheel of a truck in Islampur | इस्लामपुरात ट्रकच्या चाकाखाली सापडून नऊ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, ट्रकचालकावर गुन्हा

इस्लामपुरात ट्रकच्या चाकाखाली सापडून नऊ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, ट्रकचालकावर गुन्हा

Next

इस्लामपूर : उरुण परिसरातील खेड रस्त्यावर काल, रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रासायनिक खतांची पोती भरून निघालेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून सायकलवरून घरी येत असलेल्या नऊ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

निरंजन सचिन पाटील (९, रा. जाधव गल्ली, इस्लामपूर) असे मुलाचे नाव आहे. या अपघातप्रकरणी चुलते संजय प्रभाकर पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालकाविरुद्ध अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

निरंजन हा सायकलवरून खेड रस्त्याने घरी परत येत होता. त्यावेळी ट्रक क्र. एम एच ५० एन ४६५९ हा रासायनिक खतांची पोती भरून खेडकडे निघाला होता. खेड रस्त्यावरील तिकाटण्यावर निरंजन आला असताना तो ट्रकच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली सापडला. यामध्ये ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला.

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी निरंजनची ओळख पटत नव्हती. शेवटी त्याच्या कपडे आणि सायकलवरून त्याची ओळख पटली. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी फोडलेल्या हंबरड्याने सगळा परिसर शोकसागरात बुडून गेला होता. चिमुरड्याच्या मृत्यूचा चटका प्रत्येकाला बसला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. ट्रक ताब्यात घेऊन अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

हाकेच्या अंतरावर घर..!

ज्या ठिकाणी अपघात झाला तेथून केवळ काही अंतरावर निरंजनचे घर आहे. तीन रस्ते मिळालेले ठिकाण ओलांडून तो जरा पुढे आला असता तरी ही दुर्दैवी घटना घडली नसती. मात्र त्याच्यासाठी चढावर आणि ट्रकसाठी उतारावर असणाऱ्या या तिकाटण्यावर निरंजनचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत होती. घरापासून हाकेच्या अंतरावर मुलगा गतप्राण झाल्याने कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता.

Web Title: A nine-year-old boy was found dead under the wheel of a truck in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.