पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर उतरले दिघंचीच्या माळावर, फ्रेंच नागरिक तब्बल सहा तास भरकटला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:14 PM2024-02-21T12:14:38+5:302024-02-21T12:16:44+5:30

फ्रान्समधून आलेल्या पिअर अलेक्सचे दिघंचीकरांनी केले स्वागत

A paraglider who strayed from Panchgani landed at Dighanchi, a French national lost for six hours | पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर उतरले दिघंचीच्या माळावर, फ्रेंच नागरिक तब्बल सहा तास भरकटला

पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर उतरले दिघंचीच्या माळावर, फ्रेंच नागरिक तब्बल सहा तास भरकटला

अमोल काटे

दिघंची : सातारा जिल्ह्यातील पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दिघंची (ता. आटपाडी) येथे उपसरपंच तेजश्री मोरे याच्या शेतात उतरले. सुटी घालवण्यासाठी भारतात आलेला फ्रेंच नागरिक पियर अलेक्स हा पाचगणी येथून पॅराग्लाइडिंग करताना तब्बल सहा तास भरकटला. आवळाई रस्त्यावरील मोरे यांच्या शेतात उतरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली हाेती. युवकांनी पाहुणचार करून या परदेशी पाहुण्याला खासगी माेटारीतून पाचगणीस रवाना केले. मागील आठवड्यातही पिअर अलेक्स भरकटून सांगोला तालुक्यातील इटकी येथे आला होता.

सुटी घालवण्यासाठी अनेक फ्रेंच नागरिक भारतात येतात. पॅराग्लाइडिंगसाठी सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पोहोचतात. पॅराग्लाइडिंग हा धाडसी लोकांचा छंद आहे. त्यासाठी पाचगणी येथे परदेशी लोकांची माेठी गर्दी असते. अनेकदा वाऱ्याचा अंदाज न आल्याने पॅराग्लाइडर भरकटतात. असाच प्रकार सोमवारी पियर अलेक्सबाबत घडला. पाचगणी येथून निघाल्यानंतर तब्बल सहा तास ताे हवेत भरकटला. दिघंची येथील माळावर ताे सुरक्षितपणे उतरला. विकास मोरे, वासुदेव पुजारी, महादेव पुसावळे, सचिन माईनकर, संदीप धर्माधिकारी, युवराज चव्हाण, आदींनी त्याची विचारपूस केली. खासगी वाहनातून त्याला पाचगणीला रवाना केले.

मदत करण्याच्या वृत्तीचे कौतुक 

दिघंचीमधील एका युवकाने पाचगणीतून भरकटून आलेल्या पिअर अलेक्स याच्याशी इंग्रजीतून संवाद साधला. भारताबद्दल काय वाटते, असे विचारल्यानंतर त्याने भारतातील नागरिकांच्या मदत करण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. ‘मी इथे उतरल्यानंतरही अनेक लोक मदतीला आले, हे बघून मी भारावून गेलो’ असे सांगत ‘ही भारतीय संस्कृती अन्य देशांत पाहायला मिळत नाही,’ अशी टिप्पणीही त्याने केली.

Read in English

Web Title: A paraglider who strayed from Panchgani landed at Dighanchi, a French national lost for six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.