Sangli: बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी, ठकसेनावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 02:10 PM2023-09-08T14:10:01+5:302023-09-08T14:11:31+5:30
विटा : भारतीय डाक विभागात नोकरीसाठी दहावीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून डाक विभागाच्या नेवरी शाखेत डाकपालाची नोकरी मिळविल्याप्रकरणी प्रमोद ...
विटा : भारतीय डाक विभागात नोकरीसाठी दहावीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून डाक विभागाच्या नेवरी शाखेत डाकपालाची नोकरी मिळविल्याप्रकरणी प्रमोद कृष्णात आमणे (वय २९, रा. काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) या ठकसेनावर विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा डाक विभागाचे निरीक्षक सुरेश एकनाथ काकडे (मूळगाव रा. दमानीनगर, सोलापूर, सध्या रा. विटा) यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.
काळमवाडी येथील प्रमोद आमणे याने दि. २ मे २०२२ रोजी कडेगाव तालुक्यातील नेवरी डाक घर शाखेत सहायक डाकपाल या पदासाठी आॅनलाइन पद्धतीने आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज केला होता. त्या अर्जाच्या आधारे पडताळणी करून गुणांच्या आधारे त्याला डाक विभागाने नियुक्तिपत्र दिले होते. त्यानंतर तो दि. १ सप्टेंबर २०२२ ते ७ सप्टेंबर २०२३ पर्यंत विटा डाक विभागात कार्यरत होता.
त्यापूर्वी त्याने सादर केलेले दहावीच्या शालांत परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र डाक विभागाने पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडे दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी पाठविले होते. दि. २९ आॅक्टोबर २०२२ रोजी शिक्षण मंडळाने पडताळणी संदर्भात पत्र नं. केडीबी/बीआर.एन./२४२१ अन्वये संशयित प्रमोद कृष्णात आमणे याने सादर केलेले दहावीच्या शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर संशयित आमणे याने दहावीचे खोटे व बनावट प्रमाणपत्र सादर करून डाकपाल पदाची नोकरी मिळवित शासनाची व डाक विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.