Sangli: आमच्या भांडणात का पडतोस?, मित्रावरच मित्रांकडून चाकूने वार
By शीतल पाटील | Updated: November 28, 2023 18:37 IST2023-11-28T18:36:59+5:302023-11-28T18:37:30+5:30
मित्रांसोबतच्या वादाबाबत विचारणा केल्याच्या रागातून चाकू हल्ला

Sangli: आमच्या भांडणात का पडतोस?, मित्रावरच मित्रांकडून चाकूने वार
सांगली : मित्रांसोबतच्या वादाबाबत विचारणा केल्याच्या रागातून चौघांनी युवकावर चाकू हल्ला करून मारहाण केली. ही घटना न्यू प्राइड चित्रपटगृहासमोरील रस्त्यावर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत आदित्य विनोद माने (रा. अहिल्यानगर, झोपडपट्टी, माधवनगर, सांगली) याने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आदर्श दत्तात्रय जावीर, शंकर बाळू सपाटे (रा. राजीव गांधी झोपडपट्टी, जुना बुधगाव रस्ता, सांगली) आणि अन्य दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आदित्य माने याचे संशयित आदर्श जावीर आणि शंकर सपाटे मित्र आहेत. दोघा संशयितांचे त्यांच्या मित्रांसमवेत भांडण झाले होते. याबाबत फिर्यादी आदित्य माने याने त्यांच्याकडे विचारणा केली. याचा दोघांना राग आला. दोघांनी फिर्यादीस, आमच्या भांडणात का पडतोस, अशी विचारणा करून त्यास मारहाण केली. तसेच संशयित आदर्श जावीर याने त्याच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी अन्य अनोळखी दोघांनीही फिर्यादी आदित्यला मारहाण केली.