Sangli: कुपवाडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पिस्तूल रोखले, संशयिताविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 05:47 PM2024-07-10T17:47:39+5:302024-07-10T17:49:21+5:30

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

A pistol was installed from NCP official in Kupwad Sangli, case registered against suspect | Sangli: कुपवाडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पिस्तूल रोखले, संशयिताविरोधात गुन्हा दाखल

Sangli: कुपवाडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पिस्तूल रोखले, संशयिताविरोधात गुन्हा दाखल

कुपवाड : शहरातील दत्ता पाटोळे याच्या खून प्रकरणात न्यायालयीन कामात मदत केल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी (अजित पवार गट) ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षांवर सागर राजाराम माने (वय ३५, रा. राजारामबापू हौसिंग सोसायटी, वाघमोडे मळा, कुपवाड) याच्यावर तीन संशयितांनी पिस्तूल रोखल्याची घटना सोमवारी रात्री घडली, तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कुपवाड एमआयडीसी पोलिस, अशी दोन पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. संशयित संदेश घागरे, किरण कोंडिग्रे, अनिकेत कदम (तिघेही रा. वाघमोडेनगर, कुपवाड), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

सोमवारी रात्री वाघमोडेनगर येथे अनिल माने या तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेला सागर माने हा स्टेजजवळ मोबाइलवर बोलत उभा होता. ही संधी साधून संशयित संदेश घागरे याने हातात पिस्तूल घेऊन आणि शिवीगाळ करीत सागर माने यांच्यावर ते रोखले, तसेच त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलचा खटका दाबला; परंतु ते पिस्तूल फायर झाले नाही.

हे कृत्य पाहून घाबरलेला सागर पळून जाऊ लागला. तो पळून जात असताना संशयित घागरे याने त्याचा पाठलाग केला. पळत असताना पाय घसरून सागर रस्त्यावर पडल्याने त्याला दुखापत झाली. यावेळी सागरचा मित्र सरफराज समलेवाले त्याला वाचवण्यासाठी धावले. संशयित संदेश घागरे याच्या हातातील पिस्तूल घेऊन संशयित अनिकेत कदम याने सरफराज समलेवाले याच्यावर रोखून धरले. त्यालाही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलचा खटका दाबला; परंतु ते फायर झाले नाही. याबरोबरच संशयित किरण कोंडिग्रे याने सागर माने याला चाकूचा धाक दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. ‘वाचवा वाचवा’ असे म्हणून सागर स्टेजकडे पळत गेला. हा आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी येत असल्याचे पाहून संशयितांनी पळ काढला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयिताच्या शोधासाठी सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे व कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. संशयितांवर भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३५२, ३५१(३)(५) आर्म ॲक्ट ३, २५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: A pistol was installed from NCP official in Kupwad Sangli, case registered against suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.