आठवडाभरात होणार होता पोलीस अधिकारी; लाचेचा मोह नडला
By शरद जाधव | Published: April 28, 2023 09:46 PM2023-04-28T21:46:05+5:302023-04-28T21:46:27+5:30
कुपवाडच्या तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
सांगली : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून तो पोलिस उपनिरीक्षक झाला...पण महसूलच्या आकर्षणापोटी त्याने पुन्हा अभ्यास करून तलाठी झाला... अभ्यास करून इतर विभागातील अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने तो पुन्हा एकदा पोलिस दलात अधिकारी म्हणून सेवेत येणार होता. तोवरच दहा हजारांच्या लाचेच्या मोहाने तो ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकला.
कुपवाड येथे गुंठेवारीतील घरजागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच स्विकारताना तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. सचिन प्रल्हाद इंगोले (वय ३८, रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, विजयनगर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी कार्यालयातच सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदाराच्या मित्राचा अजिंक्यनगर, कुपवाड येथे गुंठेवारीमधील जागा आहे. त्यांनी अन्य एकाकडून ती खरेदी केली होती. यानंतर महापालिकेकडून या जागेचे गुंठेवारीचे प्रमाणपत्रही घेण्यात आले होते. मात्र, जागेच्या सातबारा उताऱ्यावर नावे लावण्यात आली नव्हते. यासाठी तक्रारदाराच्या मित्राने कुपवाड येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या नोंदी जून्या असल्याने नोंदी घालण्यासाठी तलाठी इंगोले याने तक्रारदाराकडे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता.
शुक्रवारी तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी १० हजार रूपयांची लाच स्विकारताना इंगोले यास रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, चंद्रकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
तलाठी इंगोले हा पूर्वी पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात कार्यरत होता असे समजते. मात्र, नंतर अभ्यास करून परिक्षा देत त्याने महसूल विभागात तलाठी म्हणून नियुक्ती घेतली होती. यानंतर पदोन्नती आल्याने त्याने पुन्हा एकदा सरकारकडे पोलिस दलात काम करण्याची विनंती केली हाेती. शासनानेही ती मान्य केली हाेती. दहाच दिवसात तो पोलिस दलातील सेवेत दाखल होणार होता. तोवरच दहा हजारांची लाच घेताना तो ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकला.