सांगलीत चाळीस हजारांची लाच मागणारा पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात, गुन्हा दाखल
By शरद जाधव | Published: March 21, 2023 03:51 PM2023-03-21T15:51:09+5:302023-03-21T16:02:41+5:30
गुन्ह्यामध्ये अटक न करता नोटीस देऊन सोडण्याच्या मोबदल्यात केली लाचेची मागणी
सांगली : गुन्ह्यामध्ये अटक न करता नोटीस देऊन सोडण्याच्या मोबदल्यात ४० हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विश्रामबाग पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अकबर खताळसो हवालदार (वय ५३, रा. वर्धमान इमरड अपार्टमेंट, अल्फान्सो स्कूलजवळ, मिरज) असे संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराचा भाऊ व इतर दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावास अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच तपासात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक अकबर हवालदार याने सुरुवातीला ६० हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने ‘लाचलुचपत प्रतिबंधक’कडे तक्रार दाखल केली.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यात तक्रारदाराच्या भावास अटक न करता नोटीस देण्यासाठी ६० हजार रुपये लाचेची मागणी करून चर्चेअंती ५० हजार व त्यानंतर ४० हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार हवालदार याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, धनंजय खाडे, प्रतिम चौगुले, रवींद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.