सांगलीत पोलिस कर्मचाऱ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:01 PM2023-02-09T13:01:09+5:302023-02-09T13:01:45+5:30
दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आल्यावर काही मित्रांनी तत्काळ रेल्वेरूळाकडे धाव घेतली. मात्र, तोवर त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
सांगली : शहरातील तात्यासाहेब मळा परिसरात पोलिस कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. अभिजित श्रीकांत हेरले (वय २९, रा. अभयनगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. हेरले कोल्हापूर येथे भारत राखीव बटालियनमध्ये कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. मिरज रेल्वे पोलिसात घटनेची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांगली रेल्वे स्थानकापासून पुणे रेल्वेमार्गाच्या दिशेला निर्जन ठिकाणी हा प्रकार घडला. मृत हेरले हे भारत राखीव बटालियनमध्ये कार्यरत होते. गेल्या दोन दिवसांपासून ते सांगलीतच होते. सायंकाळच्या सुमारास शिंदे मळा परिसरातील रेल्वेपुलाजवळ आपली दुचाकी लावून ते रूळाच्या दिशेने गेल्याचे काही नागरिकांनी पाहिले हाेते. यानंतर त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली.
रेल्वे पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडल्याने मिरज रेल्वे पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर हेरले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
दुचाकी बेवारस स्थितीत आढळली
बुधवारी सायंकाळी शिंदे मळा येथील रेल्वेपुलाजवळ हेरले यांची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आल्यावर काही मित्रांनी तत्काळ रेल्वेरूळाकडे धाव घेतली. मात्र, तोवर त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.