बापरे..! पुजारी मंदिरावरुन मुलांना फेकतो खाली, सांगलीतील 'या' गावातील अघोरी प्रकार- video
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:39 AM2022-10-28T11:39:18+5:302022-10-28T13:54:03+5:30
पुरोगामी महाराष्ट्रात अघोरी प्रथा कधी बंद होणार?
लक्ष्मण सरगर
आटपाडी: २१ व्या शतकात वैज्ञानिक क्रांतीतून देशाची वाटचाल सुरु असताना आजही काही भागात अंधश्रद्धला खतपाणी घालणाऱ्या अनिष्ठ प्रथा सुरु आहेत. काळी जादू, गुप्तधन यासारख्या प्रकारातून अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. असाच काहीसा अघोरी प्रकार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथे आजही सुरु आहे. नवस फेडायच्या भावनेतून मुले मंदिरावरुन खाली सोडायची आणि झेलायची हा धक्कादायक प्रकार आजही सुरू आहे. मुलाच्या आरोग्याशी व आयुष्याशी खेळण्याचा प्रकार निंदनीय आहे.
मासाळवाडी येथील महालिंगराया देवाच्या यात्रेत, नवस फेडायच्या भावनेतून मंदिरावरुन पुजारी मुले खाली सोडतो आणि खाली घोंगडीत वरुन सोडलेली मुले पकडली जातात. मंदिराच्या छतावर पुजारी उभा राहून तो त्या लहान मुलांचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात हे पकडून या मुलाला खाली घोंगडी धरून उभ्या असलेल्या लोकांकडे फेकतो. खाली त्या मुलाला झेलण्यासाठी चार लोक घोंगडी धरून लोक उभे असतात. पण अपघाताने त्या लहानग्याचा जीव जाऊ शकतो याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
अशा पद्धतीने लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार निश्चितच अंगावर शहारे उभा करणारा आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा या गावात सुरू असून देवाला काही विशिष्ट हेतूने बोललेले नवस फेडण्याच्या उद्देशाने मुलांना असे मंदिरावरून टाकण्याचा दुर्देवी प्रकार सुरू आहे. यात्रा कमिटी, गावचे सरपंच व मंदिर पुजारी यांच्यावर कारवाई झाली तरच आशा प्रथा भविष्यात बंद होतील अन्यथा अशा प्रथेला खतपाणीच घातले जाईल.
पुरोगामी महाराष्ट्रात अघोरी प्रथा कधी बंद होणार?
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बापरे..! पुजारी मंदिरावरुन मुलांना फेकतो खाली, सांगलीत मासाळवाडी गावातील अघोरी प्रकारhttps://t.co/CbvSFUjpi9#Maharshtra#sanglipic.twitter.com/uP4OIfiID9
— Lokmat (@lokmat) October 28, 2022
लहान मुलांना मंदिरावरून फेकणे ही अघोरी अंधश्रद्धा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी श्यामवर्धने यांनी ही परंपरा बंद करून त्याला आळा घातला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर पावले उचलून कारवाई करावी अशी मागणी अनिसने केली आहे. - राहुल थोरात, अंधश्रद्धा निर्मूलन समिती