सांगलीतील गोकुळनगरमध्ये वेश्या अड्ड्यावर छापा, दोघांवर गुन्हा दाखल
By शीतल पाटील | Published: October 23, 2023 09:01 PM2023-10-23T21:01:37+5:302023-10-23T21:01:51+5:30
पश्चिम बंगाल, बांगलादेशी महिलांची सुटका
सांगली: शहरातील गोकुळनगरमधील वेश्या अड्ड्यावर सोमवारी विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात सात बांगलादेशी आणि तीन पश्चिम बंगाल अशा दहा महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी सितारा मतीन शेख (रा. गोकुळनगर गल्ली क्रमांक पाच, मूळ रा. धाना रूपगंज, जि. नारायणगंज, बांगलादेश) आणि खोली भाड्याने देणारा भिवा महादेव शिंदे (वय ३५, रा. अभिनंदन कॉलनी) अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रेस्क्यू फाउंडेशनच्या तनुजा साहेबराव काळे (वय ३७, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील गोकुळनगर येथे बांगलादेशातील महिलांना आणून त्यांच्याकडून जबदरस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती फिर्यादी काळे यांना मिळाली होती. त्यांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून दिले होते. कुंटणखान्यात बांगलादेशी महिला असल्याचे समजताच पोलिसांनी छापा टाकून दहा महिलांची सुटका केली. त्यांना महिला सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या संबंधित संशयितांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम आणि विदेशी नागरिक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संजय मोरे, संदिप वाघमारे, अफरोज पठाण, बसवराज शिरगुप्पी, विक्रम चव्हाण, अमोल भोळे, सुषणा शेवकर, कुमार गुरू थोरे यांचा पथकाने केली.