तरुणीशी बळजबरी बोलायला पाडलं भाग, वृद्धाला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळले पाच लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:54 PM2022-03-04T16:54:08+5:302022-03-04T17:08:49+5:30
पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या पैलवानासह तिघांना घेतले ताब्यात
सांगली : शहरातील वसंतनगरमधील वृद्धाला तरुणीशी व्हिडीओ कॉलवर बोलायला भाग पाडत त्याच्याकडून पाच लाखाची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विलास लक्ष्मण शिंदे (वय ६३, रा. वसंतनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या पैलवानासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी शिंदे कुटुंबीयांसह वसंतनगरमध्ये राहतात. रोज सकाळी ते वसंतदादा कुस्ती केंद्र परिसरात व्यायामासाठी जातात. तिथे त्यांची एका पैलवानाशी ओळख झाली होती. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी एका तरुणीचा शिंदे यांना फोन आला होता. त्यावेळी ते तिच्याशी बोलले होते. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२१ रोजी त्या तरुणीने ‘तुम्हाला पाहायचे आहे’ असे सांगत त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. त्याच दिवशी सायंकाळी परत तिचा फोन आला. त्यावेळी एक पुरुष त्यांच्याशी बोलला की, ‘तुम्ही माझ्या मुलीसोबत व्हिडीओ कॉलिंग करून बोलता. ते शुटिंग माझ्याकडे आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावे लागेल’.
शिंदे यांनी हा प्रकार त्या पैलवानाला सांगितला. यावर प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने तो शिंदे यांना घेऊन वसंतदादा सूतगिरणी- मिरज रस्त्यावरील पालवी हॉटेलजवळ गेला. तिथे एका मोटारीतून काही तरुण आले व त्यांनी शिंदे यांना धमकी देत, ‘बहिणीबरोबर व्हिडीओ कॉलवर का बोलला’, असे विचारत पाच लाख रुपयांची मागणी केली. यावर शिंदे यांनी त्यांना २० हजार रुपये दिले. त्यानंतर शिंदे यांचे संशयितांनी अपहरण करत माधवनगर कॉटनमिल परिसरात नेले. तेथे त्यांना मारहाण केली व पैलवानाला फोन करून बोलविण्यात आले. यावेळी संशयितांनी शिंदे यांच्याकडे २० लाखांची मागणी केली. शिंदे यांनी त्यांना पाच लाख रुपयांचा धनादेश दिला.
चार महिन्यांच्या काळात उर्वरित पैशांसाठी पैलवानांसह संशयितांनी पुन्हा त्यांना बोलावून घेऊन मारहाण केली. खंडणीच्या प्रकारास कंटाळून शिंदे यांनी गुरुवारी संजयनगर पोलिसात संशयितांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने त्या पैलवानासह तिघांना ताब्यात घेतले आहे.