दहा मिनिटात ३१० जोर मारण्याचा विक्रम, सांगलीत रंगल्या जोर मारण्याच्या स्पर्धा
By अविनाश कोळी | Published: March 9, 2024 04:22 PM2024-03-09T16:22:02+5:302024-03-09T16:22:17+5:30
सांगली : येथील श्री समर्थ व्यायामशाळेमध्ये दासनवमी उत्सवानिमित्त जोर मारण्याच्या स्पर्धा पार पडल्या. चुरशीच्या या स्पर्धेत अवघ्या दहा मिनिटात ...
सांगली : येथील श्री समर्थ व्यायामशाळेमध्ये दासनवमी उत्सवानिमित्त जोर मारण्याच्या स्पर्धा पार पडल्या. चुरशीच्या या स्पर्धेत अवघ्या दहा मिनिटात ३१० जोर मारून सांगलीच्या शुभम चव्हाणने विक्रम नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.
आधुनिक व्यायामाच्या युगात पूर्वीपासून चालत आलेल्या जोर, बैठका, सपाट्या, गदा, खोरे अशा व्यायाम प्रकारांना प्रोत्साहन देण्याचे काम व्यायामशाळेमार्फत केले जात आहे. गेल्या ५० वर्षांपासून या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यंदा लहान व मोठ्या अशा दोन गटात स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत मोठ्या गटात शुभम चव्हाण याने १० मिनिटात ३१० जोर मारून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक संतोष तांबट, तृतीय क्रमांक प्रथमेश वैद्य, तर चतुर्थ क्रमांक अनिकेत कुलकर्णी यांनी पटकाविला. लहान गटात पार्थ सिद्ध याने पाच मिनिटात १२० जोर मारून प्रथम क्रमांक पटकावला तर केदार पांडे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
सायंकाळ सत्रात ब्रह्मवृंद मंत्रजागर होऊन आमदार सुधीर गाडगीळ व त्वचारोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पुरंदरे यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. संस्थेचे सचिव आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच रामकृष्ण चितळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रमेश गोवंडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, बापू हरिदास, हरी महाबळ आदी उपस्थित होते.