Sangli: मोटार अपघातात इस्लामपूरचे धर्मगुरु जागीच ठार, अन्य तिघे जखमी; टायर फुटल्याने झाली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:42 IST2025-02-07T17:42:30+5:302025-02-07T17:42:55+5:30
सांगली : इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मीफाट्याजवळ मोटारीचे टायर फुटून विजेच्या खांबावर आदळल्याने इस्लामपूर येथील धर्मगुरू हाफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय ...

Sangli: मोटार अपघातात इस्लामपूरचे धर्मगुरु जागीच ठार, अन्य तिघे जखमी; टायर फुटल्याने झाली दुर्घटना
सांगली : इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मीफाट्याजवळ मोटारीचे टायर फुटून विजेच्या खांबावर आदळल्याने इस्लामपूर येथील धर्मगुरू हाफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय ५०) हे जागीच ठार झाले, तर अस्लम मिस्त्री (६२), समीर सरवर मुल्ला (५०), फैयाज लियाकत इबुशी (५२, सर्व रा. इस्लामपूर) हे तिघे जण जखमी झाले. यापैकी समीर मुल्ला हे गंभीर जखमी आहेत. गुरुवारी हा अपघात घडला.
पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, धर्मगुरू बारस्कर हे इस्लामपूर येथील रहिवासी आहेत. सांगलीतील एका कुटुंबाच्या भेटीसाठी ते दुपारी इस्लामपूर येथील अस्लम, समीर आणि फैयाज यांच्यासमवेत मोटार (एमएच १४ बीसी ६६२४) मधून येत होते. लक्ष्मीफाट्याजवळ त्यांच्या मोटारीचे पुढील टायर फुटले. त्यामुळे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. काँक्रीटच्या रस्त्यावरून मोटार एका बाजूला उलटून खड्ड्यातून फरफटत जात विद्युत खांबावर जोरदार आदळली.
धडक इतकी जोरात होती की, विजेचा खांब वाकला, तर चालकाच्या शेजारी बसलेले बारस्कर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. समीर मुल्ला गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावरून जाणारे वाहनचालक थांबले. तत्काळ १०८ रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेतून जखमींना टिंबर एरियातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी तिघांपैकी फैयाज आणि अस्लम यांची प्रकृती स्थिर आहे, तर समीर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताची नोंद करण्यात आली. बारस्कर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजतात समाजबांधव मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
हॉस्पिटलमध्ये गर्दी
धर्मगुरू बारस्कर यांना समाजात मानाचे स्थान आहे. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच सांगली आणि इस्लामपूर परिसरातील मुस्लीम बांधवांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली होती.