मागासवर्गीय आयोगामार्फत भटक्या गोसावी जमातीच्या अभ्यास संशोधनासाठी रामदास आठवलेंना निवेदन
By संतोष भिसे | Published: March 26, 2023 07:18 PM2023-03-26T19:18:34+5:302023-03-26T19:18:59+5:30
मागासवर्गीय आयोगामार्फत भटक्या गोसावी जमातीच्या अभ्यास संशोधनासाठी रामदास आठवलेंना निवेदन देण्यात आले.
सांगली: राज्य मागासवर्ग आयोगामार्फत भटक्या गोसावी जमातीचा अभ्यास व संशोधन करावे अशी मागणी भटके गोसावी समाज महासंघाने केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. रविवारी बलगवडे (ता. तासगाव) येथे निवेदन दिले. यावेळी खासदार संजय पाटील, विवेक कांबळे उपस्थित होते.
याविषयी वरिष्ठ स्तरावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. निवेदन देण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवाजी गोसावी, अक्षय माळी, आप्पासाहेब जाधव, अनिल जाधव, देवा जाधव, सीताराम जाधव, महेश जाधव आदी उपस्थित होते. निवेदनात म्हंटले आहे की, भटका गोसावी समाज आजही राज्यभरात विखुरला आहे. आदिवासीसारखे जीवन कंठत आहे. त्यांची लोकसंख्या सात ते आठ लाखांवर आहे.
विशेषत: सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, रायगड, अहमदनगर, मुंबई, विदर्भ, मराठवाडा व खानदेशात मोठ्या संख्येने आहे. भूमिहीन असल्याने भटकंती करत व भिक्षा मागून उदरनिर्वाह करत आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या मागास असूनही शासन दखल घेत नाही. त्यामुळे त्यांचे नेमके सर्वेक्षण आवश्यक आहे. त्यांच्या परंपरा अन्य गोसावी समाजापेक्षा वेगळ्या असल्याने संशोधनाची गरज आहे. त्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगाकडे सोपवावी. त्यातून समाजाच्या विकासासाठी योजना राबवता येतील.