लांडग्यांसाठी आटपाडीतील डुबई कुरण राखीव, राज्य शासनाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 02:23 PM2022-09-22T14:23:14+5:302022-09-22T14:33:43+5:30
वन्यजीवांचे संवर्धन करताना ग्रामस्थांना व वनक्षेत्राच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत या नवीन संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे.
सांगली : वन्यजीवांचे संवर्धन होण्यासाठी राज्य शासनाने घोषणा केलेल्या नवीन १८ संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये आटपाडी तालुक्यातील स्वतंत्रपूर वसाहतीजवळील डुबई कुरणाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डुबई कुरणामध्ये लांडग्यांसाठी संरक्षित क्षेत्र असणार आहे.
वन्यजीवांचे संवर्धन करताना ग्रामस्थांना व वनक्षेत्राच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत या नवीन संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यात नवीन १८ व ७ प्रस्तावित संवर्धन राखी क्षेत्रात डुबई कुरणाचा समावेश असून, याचे ९.४८ चौरस किलोमीटर क्षेत्र असणार आहे.
आटपाडी तालुक्यात समृद्ध वनसंपदा असून, पाणी टंचाईवेळीही वनक्षेत्र टिकून आहे. आता पाण्याची सोय झाल्याने या तालुक्यात सध्या वनराई बहरत आहे. लांडग्याचा अधिवास शोधून त्यावर अभ्यास करून या क्षेत्रात पुढील कामे होणार आहेत.
पर्यटनाला मिळणार संधी
जिल्ह्यात सागरेश्वर येथे पर्यटनाचा विकास करण्यात आला आहे. आता डुबई कुरण परिसरातही पर्यटनाच्या दृष्टीने उपाय करण्यात येतील. या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना हॉटेलिंग, पर्यटन वाढीसाठी निधीचीही तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आटपाडी तालुक्यात आता पर्यटनक्षेत्र तयार होणार आहे.