सांगली: निवृत्त पोलिसाची नदीत उडी घेऊन आत्महत्या, लाचप्रकरणी झाली होती सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 05:22 PM2022-07-23T17:22:27+5:302022-07-23T17:23:05+5:30
लाच प्रकरणात न्यायालयाने कांबळे यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यामुळे ते निराश होते.
सांगली : लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेल्या निवृत्त पोलीस हवालदाराने गुरुवारी दुपारी अंकली (ता. मिरज) येथे कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. अशोक नामदेव कांबळे (वय ६४, रा. सांगली, मूळ भोसे, ता. मिरज) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१२ मध्ये तुंग (ता. मिरज) येथील लाकूड व्यापाऱ्याकडील कामगाराचा झाडे तोडताना खाली पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास असलेल्या कांबळे यांनी गुन्ह्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जानेवारी २०१२ रोजी लाच स्वीकारताना सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातच कांबळे यांना रंगेहात पकडले होते. यानंतर कांबळे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करून त्यांची न्यायालयात सुनावणी सुरू होती.
शनिवार, दि. १६ रोजी न्यायालयात लाचप्रकरणी कांबळे यांना दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यामुळे ते निराश होते. यातूनच त्यांनी अंकली येथे पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पथकाने भेट देऊन पाहणी करत पोलिसांनी हेल्पलाईनच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. शुक्रवारी सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता.
आत्महत्येपूर्वी मुलीला केला व्हिडिओ कॉल
गुरुवारी सकाळी कांबळे घरातून बाहेर पडले. दुपारी दोनच्या सुमारास अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावर आल्यानंतर त्यांनी तिथून त्यांच्या मुलीला व्हिडिओ कॉल केला आणि आत्महत्या करीत असल्याचे सांगत फोन बंद केला. यानंतर त्यांनी नदीत उडी घेतल्याची शक्यता आहे. पुलावर कांबळे यांचे चप्पल आढळले.