सांगली: रस्ता नाय तर शाळा नाय, रस्ता रोको आंदोलनात शाळकरी मुलाचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 02:22 PM2022-09-01T14:22:06+5:302022-09-01T14:23:36+5:30
आंदोलनात महिला व शाळेच्या लहान मुलाचा देखील सहभाग
वांगी (सांगली): वांगी (ता. कडेगाव) येथील देवराष्ट्रे रोड लगत असणाऱ्या स्मशानभूमीच्या पाठीमागील लोकवस्तीकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी आज, गुरुवारी सकाळी ८ वाजता थेट रस्त्यावर उतरुन जुना सांगली - सातारा व वांगी ते सोनहीरा कारखाना रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात महिला व शाळेच्या लहान मुलाचा देखील सहभाग होता. रस्ता नाय तर शाळा नाय अशा घोषणा देत शाळकरी मुलांनी परिसर दणाणून सोडला.
वांगी येथील देवराष्ट्रे रोड लगत असणाऱ्या स्मशानभूमी पाठीमागील बाजूस जवळपास ४० कुटुंबांची लोकवस्ती आहे. या लोकवस्तीकडे जाण्यासाठी गावाजवळून रस्ता होता. मात्र काही दिवसापुर्वी हा रस्ता बंद झाला. त्यानंतर स्मशानभूमी पासून पर्यायी रस्ता सुरू केला. मात्र येथेही वाद झाल्यामुळे १५ ऑगस्ट पासून हाही रस्ता संरक्षण तार लावून बंद करण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांना येण्या-जाण्याची मोठी अडचण होत आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून यावर तोडगा न निघाल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन जुना सांगली - सातारा व वांगी ते सोनहीरा कारखाना परिसरात रस्ता रोको आंदोलन केले.
..अन्यथा तीव्र आंदोलन
येत्या आठ दिवसात चारही बाजूने रस्ता करावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला. यावेळी गट विकास अधिकारी भानुदास साळवी व नायब तहसीलदार दिलीप भीसे यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनावेळी चिचणी - वांगीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.