Sangli News: भरधाव मोटार रसवंतीगृहात घुसून विद्यार्थी ठार, चालक झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 04:50 PM2023-03-27T16:50:11+5:302023-03-27T16:50:41+5:30
खंडोबाचीवाडी गावावर शोककळा
भिलवडी : खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथे भरधाव वेगाने जाणारी मोटार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ संतोष शिंदे (वय ११) असे मृताचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२.४० च्या दरम्यान घडला. भिलवडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंंद झाली आहे.
तासगाव-भिलवडी रस्त्यालगत खंडोबाचीवाडी येथे एका पेट्रोल पंपाच्या जवळ शेताकडेला संतोष गोपाळ शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. रविवारी दुपारी या ठिकाणी त्यांचा मुलगा समर्थ बसला होता. यावेळी अचानक भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी मोटार (क्र. एमएचसीएक्स ४०८१) रसवंतीगृहाच्या शेडमध्ये घुसली. मोटारीचा वेग इतका भरधाव होता की, रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललेली मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूच्या रसवंतीगृहात घुसली. रसवंतीगृहाची पत्र्याची शेड उचकटून शेतात कोसळली. मोटारीच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने समर्थ शिंदेचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. मोटार तेथेच सोडून चालक पसार झाला होता. याबाबत भिलवडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांसह खंडोबाचीवाडी, भिलवडी येथील नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेतली.
खंडोबाचीवाडी गावावर शोककळा
संतोष शिंदे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांना पती, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार होता. मुली १२ वी व १० वी इयत्तेत शिकत असून समर्थ वसंतराव दादा पाटील विद्यालय खंडोबाचीवाडी येथे इयत्ता ५ वीमध्ये शिकत होता. एका बाजूला शासनाने दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असताना दुसरीकडे चालकांचे वाहनांच्या वेगावरचे नियंत्रण सुटत आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.