भरधाव मोटारीच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार, शाळेतून परतताना घडली घटना; सांगली जिल्ह्यातील उटगी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:56 PM2024-01-06T13:56:24+5:302024-01-06T13:56:58+5:30
उमदी/माडग्याळ : उटगी (ता. जत) येथे भरधाव मोटारीच्या धडकेत श्रावणी उमेश लिगाडे (वय १०, रा. उटगी) ही शाळकरी मुलगी ...
उमदी/माडग्याळ : उटगी (ता. जत) येथे भरधाव मोटारीच्या धडकेत श्रावणी उमेश लिगाडे (वय १०, रा. उटगी) ही शाळकरी मुलगी ठार झाली. अपघातात तिची लहान बहीण श्रद्धा (वय ८) गंभीर जखमी झाली. उमदी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
मोटारीच्या धडकेनंतर दोघी जखमी बहिणींना ग्रामस्थांनी उपचारासाठी नेले, पण श्रावणीचा वाटेतच मृत्यू झाला. श्रद्धावर जतमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोघी बहिणी उमदी येथील डेफोडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होत्या. दुपारी शाळा सुटल्यानंतर स्कूल बसमधून घराकडे निघाल्या होत्या. उटगी ते उमदी रस्त्यावर काही अंतरावर लिगाडे कुटुंबीयांची शेती आहे. तेथे स्कूल बसमधून दोघी उतरल्या. रस्ता ओलांडून शेताकडे जात असताना उटगीकडून आलेल्या भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
ग्रामस्थांनी उपचारांसाठी जतकडे नेले, पण श्रावणीचा रस्त्यातच मृत्यू झाला. श्रद्धा गंभीर जखमी असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्षक व ग्रामस्थांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नव्हती.
आजी-आजोबांची भेट झालीच नाही
श्रावणी व श्रद्धाचे वडील उटगी येथे कत्ती वस्तीवर जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे. लिगाडे कुटुंबीय उटगी गावात राहते. दोघी बहिणी दररोज शाळेतून स्कूल बसधून थेट गावातील घराकडे जातात. पण आज त्यांचे आजी-आजोबा शेतात आले असल्याने त्यांनी बसमधून शेतात उतरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयच काळ ठरला. आजी-आजोबांची भेट झालीच नाही.