सांगलीत दोन ठिकाणी लागली भीषण आग; गोदाम, दुकान जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:45 PM2022-04-07T19:45:20+5:302022-04-07T19:45:43+5:30
सांगली : शहरातील गणपती पेठ परिसरात असलेल्या रंगाच्या दुकानाला व माधवनगर येथील चप्पलच्या गोदामाला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण ...
सांगली : शहरातील गणपती पेठ परिसरात असलेल्या रंगाच्या दुकानाला व माधवनगर येथील चप्पलच्या गोदामाला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली. रंगाच्या दुकानाचे सुमारे वीस लाखांचे तर माधवनगर येथील चप्पल गोदामाचे ५० ते ६० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दोन्हीही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
माधवनगर येथील रविवार पेठ परिसरात मखिजा यांचे भारत कार्पोरेशन सेल्स या नावाने पॅरागॉन चप्पल कंपनीचे गोदाम आहे. गुरुवारी मध्यरात्री अचानक गोदामास आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. गोदामास कुलूप असल्याने पथकास अडचणी येत होत्या. जवानांनी कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर आतून आगीचे मोठे लोट बाहेर येत होते. महापालिका आणि तासगावच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
सांगली शहरात गणपती पेठ परिसरात विष्णू श्रीधर साने यांचे रंगाचे दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानासही आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलास घटनेची माहिती. रात्री सव्वादोनच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीत दुकानातील सर्व साहित्य व पाठीमागे राहण्यास असलेले इमारतीचे मालक जोशी यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यही आगीच्या भक्षस्थानी पडले.