पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण..

By संतोष भिसे | Published: September 17, 2022 06:19 PM2022-09-17T18:19:53+5:302022-09-17T18:20:47+5:30

काही वेगळेच असल्याचे लक्षात येताच सांगलीच्या शासकीय रुग्णायात धाव घेतली.

A six kg tumor was removed from the woman's stomach at the Sangli Civil Hospital | पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण..

पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण..

googlenewsNext

सांगली : तिचे वय ५५ वर्षे. लग्नाला ३५-४० वर्षे झाली, तरी अपत्यप्राप्ती नव्हती. वर्षभरापूर्वी अचानक पोटाचा आकार वाढू लागला. प्रत्येक महिन्याला वाढतच गेला. दैवकृपेने गर्भधारणा झाली असावी म्हणून दुर्लक्ष केले. पण हे काही वेगळेच असल्याचे लक्षात येताच सांगलीच्या शासकीय रुग्णायात धाव घेतली. पोटात अनावश्यकरित्या वाढत असलेली गाठ डॉक्टरांनी काढून टाकली.

चार-पाच तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेला नकोशा ओझ्यापासून मुक्तता मिळाली. सध्या तिची प्रकृती ठणठणीत असून आठवडाभरांनी घरी सोडले जाईल. शासकीय रुग्णालयात वर्षाला हजारो रुग्णांचा अनुभव घेणाऱ्या तज्ञ डॉक्टरांसाठीही ही गाठ अनोखी ठरली. एरवी रुग्णाच्या पोटात किलो-दोन किलोच्या गाठी आढळतात. सरासरी महिन्याला एशी एखादी शस्त्रक्रिया होतेच. पण या महिलेच्या पोटातील गाठ मात्र वजनाला तब्बल सहा किलो भरली. इतक्या ओझ्याचा त्रास महिलेने काही महिने सहन केला.

पोटात सतत दुखते, शौचाला व मूत्र विसर्जनाला त्रास होतो अशी तिची तक्रार होती. काहीवेळा औषध दुकानातून गोळ्या खाऊन पोटदुखी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्रास आणि पोट वाढू लागले, तसे खासगी रुग्णालयातही किरकोळ तपासण्या केल्या. सरतेशेवटी मात्र वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात धाव घेतली.

शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया पार पडली. स्त्रीरोग तज्ञ डॉ. नंदकिशोर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिल्पा दाते व सहकाऱ्यांनी गाठ बाहेर काढली. डॉ. मिसाळ, डॉ. खैरमोडे व डॉ. अनुश्री चौधरी यानी भूलतज्ज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळली.

गर्भाशयाबाहेर वाढली गाठ

स्त्रीरोग विभागात कसून तपासणी केली असता, पोटात गाठ तयार झाल्याचे लक्षात आले. गर्भाशयाच्या बाहेरील बाजूला तयार होऊन वाढत होती. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. गाठीचा आकार आणि वजन जास्त असल्याने शस्त्रक्रियेवेळी विशेष काळजी घ्यावी लागणार होती. शस्त्रक्रियेनंतर गाठीचा काही भाग पुढील तपासणीसाठी पाठविला आहे. शासकीय रुग्णालयाच्या दृष्टीने ही शस्त्रक्रिया दुर्मिळ ठरली.

Web Title: A six kg tumor was removed from the woman's stomach at the Sangli Civil Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.