सांगलीच्या रामभक्तांसाठी खुशखबर, अयोध्येला धावणार रेल्वे
By अविनाश कोळी | Published: January 23, 2024 11:51 AM2024-01-23T11:51:51+5:302024-01-23T11:54:59+5:30
सांगली : जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. येत्या १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरुन अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार ...
सांगली : जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. येत्या १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरुन अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार असून कानपूर, प्रयागराजमार्गे ती अयोध्येला जाणार आहे. अयोध्येतून १६ रोजी परतीची रेल्वे आहे.
मंगळवारी १३ फेब्रवारी रोजी रात्री ११.४५ वाजता सांगली स्थानकावरुन अयोध्याधाम जाणारी विषेश रेल्वे गाडी (क्र.००१४८) सुटणार आहे. त्यानंतर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९.२० वाजता अयोध्येतून गाडी (क्र. ००१४९) सांगली स्थानकावर परत येणार आहे. अयोध्येला जाणारी ही विशेष रेल्वे इतर मोठ्या जंक्शनप्रमाणेच सांगली रेल्वे स्थानकावर जास्त वेळ म्हणजे पाच मिनिटे थांबणार आहे.
मागच्या महिन्यात सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मध्य रेल्वेकडे श्रीरामाच्या दर्शनासाठी सांगलीतून अयोध्येला गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करत मध्य रेल्वेने भाविकांसाठी विशेष रेल्वे दिली आहे. त्याचप्रमाणे मंचने सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असल्याने येथे पाच मिनिटांचा थांबा देण्याची विनंती केली होती. तीही रेल्वेने मान्य केली आहे.
सांगली स्टेशनवरुन सुटून ही गाडी सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज येथे थांबून गुरुवारी १५ फेब्रूवारीस दुपारी १ वाजता अयोध्या धाम पोहोचेल.
या रेल्वेमुळे प्रवासी भाविकांना गुरुवार व शुक्रवार दोन दिवस अयोध्येत राहण्यास मिळतील. परतीच्या प्रवासात ही गाडी अयोध्या धाम येथून शुक्रवारी रात्री सुटेल. परतीच्या प्रवासातही त्याच स्थानकांवर थांबून सांगली रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे रविवारी १८ फेब्रुवारीस सकाळी १०.५० वाजता पोहोचेल.
या विशेष गाडीचे आरक्षण बुधवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल. ही गाडी फक्त एकच दिवस धावणार त्यामुळे इच्छुक प्रवासी भाविकांनी तातडीने बुकिंग करावे. प्रवासाच्या सुरुवातीचे स्थानक व बोर्डिंग स्टेशन म्हणून सांगलीचा उल्लेख करावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, यांनी केले आहे.