वन व गायरान जमिनी प्रश्नी राज्यव्यापी लढा उभारणार, आमदार भाई जयंत पाटलांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:20 PM2022-08-29T14:20:01+5:302022-08-29T14:20:32+5:30
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लढा देण्यासाठी संयुक्त ताकद उभा करावी लागेल.
विटा : शेतकऱ्यांच्या शेती मालाला तीन पट हमी भाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असून तरुणांना कर्ज मिळण्यासाठी कौशल्या विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल, असे सांगून राज्यातील गायरान आणि वन जमिनीप्रश्नी राज्यव्यापी लढा उभा करून हा प्रश्न विधिमंडळात मांडणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागचे आमदार भाई जयंत पाटील यांनी केली.
भिवघाट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्यात आ. भाई जयंत पाटील बोलत होते. यावेळी महिला आघाडी प्रमुख निकिता देशमुख, भाई संपत पवार-पाटील, भाई बाबासाहेब कारंडे, भाई दादासाहेब बाबर, दिगंबर कांबळे, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई गोपीनाथ सूर्यवंशी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लढा देण्यासाठी संयुक्त ताकद उभा करावी लागेल. येत्या काळात घाटमाथ्यावरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार असून राजकीयदृष्ट्या लागेल ती मदत केली जाईल.
पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई गोपीनाथ सूर्यवंशी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या. गायरान व वन जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याबरोबरच शेतकऱ्यांना १२ तास वीज द्यावी, शेतकऱ्यांच्या हद्दीत असलेल्या विजेच्या खांबाचे भूभाडे द्यावे तसेच मुद्रा व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मिळणारी कर्जे राष्ट्रीय बॅँकांच्या मुजारीमुळे तरुणांना मिळत नसल्याचा आरोप केला.
यावेळी आ. भाई जयंत पाटील यांनी आगामी काळात शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न विधिमंडळात मांडणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करण्याची हाक दिली. या मेळाव्यात आ. भाई पाटील यांच्या उपस्थितीत शेकापच्या जिल्हा प्रवक्तेपदी गणेश धेंडे तसेच पुरोगामी युवक संघटनेच्या उपाध्यक्षपदी कुंडलचे संग्राम थोरबोले यांची निवड करण्यात आली.
भाई गणेश धेंडे यांनी स्वागत तर दिगंबर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास विनोद लगारे, सुनील हसबे, उत्तम यादव, संतोष यादव, प्रल्हाद माने, राजेंद्र माने, विजय सूर्यवंशी, अमित गिड्डे, भानुदास सूर्यवंशी, गणेश धेंडे, महानंद हसबे, तानाजी भोसले, शरद मुळीक, सचिन मुळीक, अभिजीत जाधव, तानाजी तुपे, संजीव पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रल्हाद माने यांनी आभार मानले.