सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याने बालिकेचे लचके तोडले, बालिका जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 12:38 PM2022-05-09T12:38:40+5:302022-05-09T12:39:02+5:30
यापूर्वीही संजयनगर, चैतन्यनगर भागातील चार ते पाच लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
संजयनगर : सांगलीच्या चैतन्यनगर येथे अंगणात खेळत असलेल्या बालिकेचे मोकाट कुत्र्याने लचके तोडले. यात ती जखमी झाली आहे. अर्शिया जाफर मुलांनी (वय ६ वर्षे ) असे जखमी बालिकेचे नाव आहे. तिच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली आहे. उपचारासाठी तिला वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर महापालिकेविरोधात नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, प्रभाग क्रमांक ११ मधील चैतन्यनगर येथे रहात असलेले जाफर गुलाब मुलाणी यांची लहान मुलगी अर्शिया मुलाणी ही अंगणात खेळत होती. यावेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. कुत्र्याने तिच्या डाव्या हाताचा लचका तोडला. यानंतर महापालिकेचे मुकादम अमोल घुणके व स्वच्छता निरीक्षक गणेश माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. नंतर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला डॉग व्हॅनच्या कर्मचाऱ्याने पकडले.
या भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री असतानाही ती पकडण्याकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. संजयनगर भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते सुजित काटे यांनी केली आहे. मोकाट कुत्रे न पकडल्यास आंदोलनाचा इशारा काटे यांनी दिला आहे.
अनेक घटनांची नोंद
यापूर्वीही संजयनगर, चैतन्यनगर भागातील चार ते पाच लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मिरजेतील एका प्रकरणात न्यायालयाकडून महापालिकेला दंडही ठोठावला होता. तरीही महापालिकेला याचे गांभीर्य नाही.