जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने मिरजेतील विद्यार्थिनीस दहा हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:54 PM2022-12-30T17:54:08+5:302022-12-30T17:54:34+5:30
मिरज : जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने मिरजेतील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला १० हजाराला ऑनलाइन गंडा घातला. याबाबत पोलिसात तक्रार ...
मिरज : जुनी पुस्तके खरेदीच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने मिरजेतील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला १० हजाराला ऑनलाइन गंडा घातला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिरजेतील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने जुना मोबाईल विकायचा आहे, अशी जाहिरात ॲपवर टाकल्यानंतर तिचा मोबाईल चांगल्या किमतीला विकला गेला. त्यानंतर तिने घरातील काही जुनी पुस्तके विक्रीची जाहिरात टाकली. त्यावर अज्ञात भामट्याने तिला फोन करून, ‘आमचे पुस्तकाचे दुकान आहे, माझी पत्नी तुमच्याकडे येऊन पुस्तके घेऊन जाईल’, असे सांगितले.
हिंदीत बोलणाऱ्या अज्ञाताने, ‘मी सैन्यात असून मिलिटरी अकाउंटवरून पैसे पाठविण्यासाठी तुम्ही आधी दोन हजार भरा. चार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील’, असेही सांगितले. फोन पेवरून पुस्तकांची रक्कम पाठविण्यास सांगितल्याने मुलीने मैत्रिणीच्या फोन पेवरून दोन हजार पाठवले, मात्र ते पैसे पोहोचले नसल्याचा संदेश आला. त्यानंतर अज्ञाताने चार हजार व पुन्हा चार हजार रुपये पाठविण्यास सांगितले. दहा हजार रुपये पाठविल्यानंतरही रक्कम परत आली नाही.
यावर त्याने ‘आणखी तीन हजार रुपये पाठवा. तुम्हाला पंधरा हजार परत मिळतील’, असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली.