शाळेमध्ये सर म्हणतात, ‘तू तर माझ्या बायकोसारखी दिसतेस’; सांगलीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 06:09 PM2023-02-08T18:09:08+5:302023-02-08T18:27:47+5:30

मुख्याध्यापकांचा शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न

a teacher sexually assaulted girls In a Zilla Parishad school in Sangli East area | शाळेमध्ये सर म्हणतात, ‘तू तर माझ्या बायकोसारखी दिसतेस’; सांगलीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस

शाळेमध्ये सर म्हणतात, ‘तू तर माझ्या बायकोसारखी दिसतेस’; सांगलीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस

Next

सांगली : पूर्व भागातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षकाने मुलींसोबत चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य व पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत धाव घेऊन शिक्षकाच्या हकालपट्टीची मागणी केली, अन्यथा शाळा बंद ठेवण्याचा  इशारा  दिला.

प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना ग्रामपंचायत सदस्य, पालक व अखिल भारतीय सेनेचे जिल्हा संघटक विनोद कोळी यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, हा शिक्षक सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत असभ्य वर्तन करतो. मासिक धर्मामुळे शाळेत येऊ न शकलेल्या विद्यार्थिनींना मारहाण करतो. यातील एका विद्यार्थिनीला ‘तू माझ्या बायकोसारखी दिसतेस’ असे म्हणत विनयभंगही केला आहे.  

काही विद्यार्थिनींनी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांना शिक्षकाच्या वर्तणुकीची माहिती दिली. सदस्यांनी शाळेत माहिती घेतली असता, मुख्याध्यापकांनी  शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी तातडीच्या बैठकीत शिक्षकाला बोलावून विचारणा केली, तेव्हा त्याने चूक कबूल करत ‘एक वेळ माफ करा’ अशी विनंती केली.

पालकांनी सांगितले की, हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. भविष्यात अन्य मुलींसोबत अनुचित गंभीर घटना घडण्यापूर्वीच शिक्षकावर कडक कारवाई करावी.

शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी माहिती घेऊन तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले आहे. पालकांनी गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व ग्रामपंचायतीलाही याप्रकरणी कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

अन्य शाळांमध्येही मुलींची छेडछाड

दरम्यान, संबंधित शिक्षक काही महिन्यांपूर्वी अन्य गावात नियुक्तीस होता. तेथेही त्याने मुलींसोबत अश्लील चाळे केले होते. पालक आक्रमक होण्यापूर्वीच बदली झाल्याने बचावला. वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांच्या नावाने पालकांकडून वर्गणी गोळा करून चैनी करण्याची सवय त्याला असल्याचे पालकांनी सांगितले.

शाळेत तातडीने संरक्षण समितीची नियुक्ती

दरम्यान, मुख्याध्यापकांनी मंगळवारी (दि. ७) ग्रामपंचायतीला तातडीने  एक पत्र दिले. शाळेत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. तथापि, भविष्यात घडू नये म्हणून महिला व किशोरवयीन मुली संरक्षण व विकास समिती गठित केल्याचे सांगितले. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची आकस्मिक बैठक घेण्यात आली.

Web Title: a teacher sexually assaulted girls In a Zilla Parishad school in Sangli East area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.