सांगली जिल्ह्यात अघोषित संचारबंदी; तापमानाचा पारा ४२.४ अंशावर
By अविनाश कोळी | Published: April 30, 2024 07:44 PM2024-04-30T19:44:03+5:302024-04-30T19:44:22+5:30
झळांनी नागरिक हैराण : तापमान विक्रमाच्या दिशेने
सांगली : तब्बल ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी सांगली जिल्ह्यात झाली. सूर्य आग ओकत असल्याने रस्ते, चौक व बाजारपेठा दुपारच्या काळात ओस पडत आहेत. अघोषित संचारबंदीचे चित्र तापमानाने निर्माण केले आहे.
सांगली जिल्ह्याचा पारा सध्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दोन दिवसांपासून ४१ अंशाच्या घरात घुटमळणारे तापमान अचानक उसळी खाऊन मंगळवारी ४२ अंशाचा टप्पा ओलांडून पुढे गेले. त्यामुळे नागरिकांना दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण केले. शहरातील प्रमुख चौक, रस्ते तसेच बाजारपेठा ओस पडल्या होत्या. किमान तापमानही २६.६ अंश सेल्सिअसवर गेल्याने रात्रीचा उकाडाही असह्य झाला आहे. सांगली जिल्ह्यात बुधवारपासून पुढील तीन दिवस तापमान ४३ अंशाचा टप्पा गाठण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
उष्माघाताचा धोका वाढला
वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांपासून सुरक्षित रहावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.