sangli crime news: बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न, नागरिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 04:15 PM2023-01-06T16:15:20+5:302023-01-06T16:15:47+5:30

अन्य साथीदारांची नावे अद्यापही पोलिसांना सांगितलेली नाहीत.

A thief was caught and drubbing by citizens in Vita of Sangli district | sangli crime news: बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न, नागरिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपला

sangli crime news: बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न, नागरिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपला

googlenewsNext

विटा : बंद घराचे कुलूप तोडून घरातील मुद्देमाल लंपास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या घरफोड्यास नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. या मारहाणीत राजू कानू पवार (वय ४०, रा. आरोळी वस्ती, जामखेड, जि. अहमदनगर) हा चोरटा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घरफोडीतील त्याचे अन्य दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ही घटना येथे गुरुवारी मध्यरात्री तीन वाजता घडली.

येथील भवानीमाळ उपनगरात बाळासाहेब यशवंत जाधव यांचे ‘रेवणसिद्ध निवास’ नावाचे निवासस्थान आहे. ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास चोरटा राजू पवार व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

त्यावेळी शेजारी राहणारे नागरिक झोपेतून जागे झाले. त्यांनी एकत्रित येत या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात राजू पवार हाती लागल्यानंतर त्यास नागरिकांनी बेदम चोप दिला. या मारहाणीत तो जखमी झाला. मात्र, त्याचे अन्य दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नागरिकांनी पकडलेल्या चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी जखमी राजू पवार यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरफोडीच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्याने त्याच्या अन्य साथीदारांची नावे अद्यापही पोलिसांना सांगितलेली नाहीत.

चोरट्याची कसून चौकशी

दोन दिवसांपूर्वी मायणी रस्त्यावरील तेजस तारळेकर यांचा बंगला फोडून चोरट्यांनी कपाटातील रोख ४० हजार रुपयांसह २७ तोळे सोन्यावर डल्ला मारला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच बुधवारी नागरिकांनी चोरट्यास रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तारळेकर यांच्या चोरीत या चोरट्यांचा समावेश आहे का, याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

Web Title: A thief was caught and drubbing by citizens in Vita of Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.