सांगलीत मोटारींची काच फोडून रोकड लांबविणारा चोरटा जेरबंद, साडेसहा लाखांचा माल हस्तगत
By शरद जाधव | Published: May 5, 2023 06:29 PM2023-05-05T18:29:27+5:302023-05-05T18:29:49+5:30
आंतरराज्य टोळीचा छडा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस
सांगली : सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकीच्या डिकी व मोटारींची काच फोडून रोकड लांबविणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मधू भास्कर जाला (वय २५, रा. कपरालतिप्पा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून साडेसहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. संशयित जाला याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने या चोऱ्या केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात कर्मवीर चौकातील एका बँकेजवळ असलेल्या कोल्ड्रिंक दुकानापासून चोरट्यांनी गोपालदास हिरालाल मुंदडा यांची दोन लाख ९५ हजारांची रोकड दुचाकीची डिकी तोडून लांबविली होती. यानंतरही जिल्ह्यात अशाप्रकारे चोरीचे प्रकार घडले होते. त्यामुळे एलसीबीच्या वतीने याचा तपास सुरू होता.
पोलिस पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित कुपवाड येथील हनुमाननगरमध्ये भाड्याने खोली घेऊन राहण्यास आहे. त्यानुसार पथकाने राहत असलेल्या खाेलीवर छापा मारून त्यास ताब्यात घेतले. परराज्यातील असूनही तो इथे कशासाठी राहत आहे हे त्याला सांगता आले नाही. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत त्याने अखेर चोरीची कबुली दिली. यात दुचाकीच्या डिकीमधून आणि मोटारीची काच फोडून रोकड लंपास करत असल्याची कबुली त्याने दिली. घरातील झडतीमध्ये ६ लाख रुपयांची रोकड मिळून आली. तो व त्याचा साथीदार मिळून या चोऱ्या करत असल्याचे त्याने सांगितले. सापडलेली रक्कम ही वाटणीतील असल्याचेही त्याने सांगितले.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अनिल कोळेकर, संदीप पाटील, विक्रम खोत, जितेंद्र जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
या चोऱ्या आल्या उघडकीस
विश्रामबाग येथील कर्मवार चौक, व्हाइट हाउस हॉटेलसमोरील चोरी, कवठेमहांकाळ तहसील कार्यालयाच्या आवार, आष्टा येथील प्राथमिक शिक्षक बँक, कोल्हापूर येथील ई-सेवा केंद्र व इचलकरंजी येथील वारणा बँकेजवळ झालेल्या चोरीचा छडा लावण्यात यश आले.
व संशयित जाला हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने गुजरातमध्येही अशाच प्रकारे गुन्हे केले आहेत.
बँकेसमोर वॉच ठेवून डल्ला
संशयित जाला व त्याचा साथीदार बँकेसमोर वॉच ठेवून चोरी करत होते. त्यांनी सावज हेरल्यानंतर ते पाठलाग करून अगदी नकळत पैशावर डल्ला मारत होते.