सांगली जिल्ह्यातील 'या' गावात ऐतिहासिक शिवकालीन 'बारव'मध्ये दडलाय कलात्मक स्थापत्याचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:47 AM2022-04-26T11:47:31+5:302022-04-26T11:47:48+5:30

नेवरी गावालगत दक्षिण दिशेला पुरातन बारव आहे. ही पुरातन बारव आणि तिची रचना पाहिली की या गावचं गतवैभव डोळ्यात भरतं.

A treasure trove of artistic architecture hidden in the historical Barav in Sangli district | सांगली जिल्ह्यातील 'या' गावात ऐतिहासिक शिवकालीन 'बारव'मध्ये दडलाय कलात्मक स्थापत्याचा खजिना

सांगली जिल्ह्यातील 'या' गावात ऐतिहासिक शिवकालीन 'बारव'मध्ये दडलाय कलात्मक स्थापत्याचा खजिना

googlenewsNext

प्रताप महाडीक

कडेगाव : ऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव म्हणून कडेगाव तालुक्यातील नेवरी या गावाची ओळख आहे. येथील ऐतिहासिक शिवकालीन बारव या गावच्या  वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. ही ऐतिहासिक 'बारव'  गावामधील महत्वाचा ऐतिहासिक वारसा असून कलात्मक  स्थापत्याचा आदर्श नमूना आहे. या बारवेची भव्यता व देखणेपणं नजरेत भरते यामुळे ही बारव सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे.

नेवरी गावालगत दक्षिण दिशेला पुरातन बारव आहे. ही पुरातन बारव आणि तिची रचना पाहिली की या गावचं गतवैभव डोळ्यात भरतं. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार ही बारव व्यंकोजीराजे यांनी बांधली असे समजते. मात्र रचना पाहून ही बारव पुरातन काळातील असावी असेही काही लोक सांगतात.

अजूनही वाडा संस्कृतीची घरे

येथे सुरेराव व भालेराव या महाडीक बंधूंच्या शौर्याचा इतिहासही लोक अभिमानाने सांगतात. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जावई हरजीराजे महाडीक यांचे बंधू व्यंकोजीराजे महाडीक यांचा ऐतिहासीक वारसा या गावाला लाभला आहे अशी माहिती मिळते. येथे अजूनही वाडा संस्कृतीची घरे पाहायला मिळतात. येथील मोठ-मोठे वाडे ,भक्कम तटबंदी, डौलाने उभी असणारी वेस, मंदीरे ह्या सर्व गोष्टी या  प्राचीन तसेच ऐतिहासिक काळाची साक्ष देतात.

भद्रा प्रकारची बारव

येथील प्रमुख आकर्षण असलेली  बारव साधारण चौरसाकार असून या मध्ये उतरायला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही  बाजूने पाय-या बांधल्या आहेत. भद्रा प्रकारची ही बारव असून या बारवेच्या भिंतीमध्ये चारही दिशेला एकंदरीत मंदीरवजा १२ देवकोष्टके (देवळ्या) आहेत. यात देवी देवतांच्या मूर्ती होत्या. या मूर्ती सद्यस्थितीत दिसत नाहीत. वरील बाजूस पाणी खेचण्यासाठी मोट बसविण्यासाठी दगडी बांधकाम असून पाणी वाहून हौदात सोडण्यासाठी दगडी पन्हाळी बांधण्यात आल्या आहेत.



महादेवाच्या पिंडीवर सोनेरी किरणांचा अभिषेक

बारवेलगत उंच चौथऱ्यावर महादेवाचे पूर्वाभिमुख पुरातन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदय झाला की पहिल्या सोनेरी किरणांचा अभिषेक गाभाऱ्यातल्या महादेवाच्या पिंडीवर  पडतो. नेवरी  गावठाण अजुनही जुन्या पध्दतीच्या घरांनी व्यापलेले असुन गावाने अजूनही खेडुतपणा जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या गावात नवीन विहीर व पाणी योजना आली असली तरी पूर्वीच्या काळात सर्व गावाची तहान बाराही महिने भागविणारी ही बारव मात्र आज आकर्षण ठरत आहे. ही बारव पूर्व पश्चिम  स्वरूपात पहावयास मिळते. ग्रामस्थांनी येथील बारवेचे संवर्धन अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे. यापुढेही दीर्घकाळ हा ठेवा जपण्याची गरज आहे.

पुरातत्व खात्याने लक्ष देण्याची गरज 

नेवरी येथील आकर्षक बारवेलगत दोन दगडी हौदाचे व एका हत्तीकुंडाचे आकर्षक  बांधकाम दिसते. यातील एका दगडी हौदाची पडझड झाली आहे. येथील बारव, दगडी हौद आणि हत्ती कुंड हा पुरातन व ऐतिहासिक  ठेवा जपण्यासाठी पुरातत्त्व खात्यानेही वेळीच लक्ष द्यावे.आणि या बारावचे संवर्धन करावे अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Web Title: A treasure trove of artistic architecture hidden in the historical Barav in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.