Sangli: तासगाव-विटा महामार्गावर झाड कोसळले, तीन तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:40 PM2024-08-27T15:40:04+5:302024-08-27T15:42:42+5:30
प्रवासी संतप्त : दोन्ही बाजूला दोन किलोमीटर पर्यंत रांगा
तासगाव : तासगाव ते विटा महामार्गावर शिरगाव गावालगत रस्त्यावर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोठे झाड पडले आहे. तेव्हापासून तब्बल तीन तास वाहतूक ठप्प आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या हलगर्जीपणामुळे अखेर स्थानिक नागरिकांनीच हे झाड बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटरहून लांब रांगा लागल्या असून प्रवासी संतप्त झाले आहेत.
सांगली ते विटा महामार्गावर अनेक मोठे वृक्ष आहेत. सततच्या पावसामुळे तासगाव तालुक्यातील शिरगाव हद्दीत मंगळवारी सकाळी रस्त्याकडील एक मोठा वृक्ष रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र रस्त्यावर आडवा वृक्ष कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती कळवली. मात्र तब्बल तीन तास हा वृक्ष बाजूला काढण्यासाठी कोणीच आले नाही. अखेर स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेऊन रस्त्यावरील झाड बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सतत रहदारी असणाऱ्या या महामार्गावर, भर रस्त्यावर झाड आडवे पडल्यामुळे, तब्बल तीन तासापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या होत्या.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरोधात संताप
सांगली ते विटा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असतानाच, रस्त्यावर झाड पडलेले काढण्यासाठी तीन तासापर्यंत कोणतीही यंत्रणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.