Sangli- रामायणाची परंपरा जपणारी बेडगची यात्रा उत्साहात, त्राटिकेच्या सोंगाची २०० वर्षांची अनोखी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:50 PM2023-03-30T18:50:24+5:302023-03-30T18:50:39+5:30
त्राटिकाचे सोंग हे यात्रेचे मुख्य आकर्षण
मिरज : बेडग (ता. मिरज) येथे रामायणाची परंपरा जपणारी बेडगची मरगाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेत रामायणातील कथेवर आधारित पारंपरिक त्राटिकेचे सोंग सादर करण्यात आले.
वीस हजार लोकवस्तीच्या बेडग गावातील ग्रामदैवत मरगाई देवीची दरवर्षी गुढीपाडव्यानंतर यात्रा भरते. रावणाची बहीण त्राटिका व तिच्या राज्यकारभाराविषयी सोंग हे बेडगच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या सोंगांची बेडग गावात गेल्या २०० वर्षांची परंपरा आहे. पाडव्या दिवशी गुढी उभारल्यानंतर गावात दळण - कांडप बंद करण्यात येते. देवीची पालखी निघाल्यानंतर दळण कांडपास सुरुवात होते. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.
त्राटिकाचे सोंग हे यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. हे सोंग राज्यात अन्यत्र पाहायला मिळत नाही. रामायणाच्या काळात सांगली जिल्ह्यात दंडोबा या परिसरातील दंडकारण्यात रावणाची बहीण त्राटिकाचे राज्य होते, अशी आख्यायिका आहे. तिच्या राज्य कारभाराविषयी वर्णन त्राटिकाचे सोंगाद्वारे सादर केले जाते. त्या काळात युद्धाच्या वेळी वापरलेले घोडे व इतर प्राणीही सोंगाच्या रूपात दाखवून ही कथा जिवंत केली जाते.
बारा बलुतेदारांचा सहभाग
- त्राटिकाचे सोंग घेणाऱ्या कलावंतांचा त्राटिकाचा मुखवटा आकर्षक व अतिशय सुबक आहे. हे सोंग घेणारे १२ बलुतेदार आहेत. २५ फूट उंच त्राटिकेची वेशभूषा आक्राळ- विक्राळ असते. मोठा मोर पिसारा, मोठे तोंड, १२ साड्या नेसलेली त्राटिका.
- दरबारी पंतप्रधान, सेनापती, घोडेस्वार, काळीचूर, बनीचर, मोर यांच्या सह सैनिक घेऊन चौका चौकात त्राटिकेचा दरबार भरतो. रात्री दहा वाजेनंतर हलगीच्या तालावर हा कार्यक्रम सुरू होतो. त्राटिका काळ्या वेशातील सैनिकांना आपल्या राज्यव्यवस्थेविषयी प्रश्न विचारते. सैनिक विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात.