सांगलीत अनोखी पदयात्रा! आई-वडिलांचा जयजयकार, सन्मान यात्रा; नागरिकांकडून पदयात्रेवर पुष्पवृष्टी
By अविनाश कोळी | Published: March 1, 2023 07:21 PM2023-03-01T19:21:22+5:302023-03-01T19:21:41+5:30
सांगली : टीव्ही, मोबाईलच्या युगात हरवलेल्या मुलांमध्ये संस्काराचे बीजारोपण करून आई-वडिलांप्रती आदरभाव वाढविण्याकरिता माधवनगर (ता. मिरज) येथे अनोखा उपक्रम ...
सांगली : टीव्ही, मोबाईलच्या युगात हरवलेल्या मुलांमध्ये संस्काराचे बीजारोपण करून आई-वडिलांप्रती आदरभाव वाढविण्याकरिता माधवनगर (ता. मिरज) येथे अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शाळकरी मुलांनी आई-वडिलांचे पाद्यपूजन करून त्यांच्यासह सन्मान पदयात्रा काढली. यात्रेत मुलांनी आई-वडिलांचा जयघोष केला.
गजानन मिल शताब्दी विद्यालय व उद्योगरत्न धनी वेलणकर पूर्व प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी हा उपक्रम पार पडला. सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन शहा, सांगली शिक्षण संस्थेचे संचालक अमोल करंदीकर, विलास आपटे, मुख्याध्यापिका अवनी गंगातीरकर, शाला अधीक्षिका ज्योती खुरुद आदी उपस्थित होते.
शाळेच्या आवारात मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना पाटावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली. पायावर फुले वाहून त्यांनी माता-पित्यांप्रती आदरभाव व्यक्त केला. या अनोख्या उपक्रमाने पालक भारावून गेले. पाद्यपूजनानंतर माधवनगर शहरातून पालक व मुलांनी सन्मान यात्रा काढली. ‘कर्तव्यदक्ष आई-वडिलांचा विजय असो’, ‘आई-वडिलांचा जयजयकार’ अशा घोषणा दिल्या.
अनोख्या यात्रेने नागरिक, व्यापारीही भारावून गेले. चौकाचौकात या यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पदयात्रेत ग्रामपंचायत सदस्य दीपाली कदम, शुभम उपाध्ये, अनिता आवटी, तानाजी जाधव, योगेश देसाई, संजय पाटील, किशोर सासणे आदी सहभागी झाले होते. हिरा ठाकरे, अल्का पाटील, शुभांगी शेंडे आदींनी पदयात्रेचे संयोजन केले. शीला पाटील यांनी सूत्रसंचालन, ज्योती खुरुद यांनी प्रास्ताविक केले.