सांगलीत टाकाऊ वस्तुंमधून साकारले अनोखे पॅव्हेलियन, ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ संकल्पना
By अविनाश कोळी | Published: December 19, 2023 02:18 PM2023-12-19T14:18:31+5:302023-12-19T14:19:27+5:30
सांगली : ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ या संकल्पनेतून सांगली , मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदशनाखाली ...
सांगली : ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ या संकल्पनेतून सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदशनाखाली सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील आनंदवन बालोद्यानाचे रुपडे बदलण्यात आले. याठिकाणी टाकाऊ वस्तुंपासून पॅव्हेलियन साकारण्यात आले. उद्यानात ठिकठिकाणी सुशोभिकरणही केले.
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी उद्यानाचे नुतनीकरण केले. ‘माझी वसुंधरा’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाअंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील आनंदवन या बालोद्यानाचे रुपडे बदलण्यात आले आहे. द नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंटस् ऑफ आर्किटेक्चर (नासा) या संस्थेने नुतनीकरणाची जबाबदारी घेत आयुक्तांच्या संकल्पनेला मूर्तस्वरुप दिले. या संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक बॉटल्स, जुने टायर्स, बांबू अशा वस्तुंच्या पुनर्वापरापातून एका पॅव्हेलियनची रचना साकारली आहे.
या ठिकाणी पर्यावरणपूरक सामाजिक संदेश देणारी चित्रे रंगविण्यात आली आहेत. उद्यानाच्या नूतनीकरणानंतर लहान मुलांची वर्दळ वाढू लागली आहे. त्याचबरोबर आसपासच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरिता दुपारचे भोजन करण्यासाठी ही एक हक्काची निसर्गरम्य जागा उपलब्ध झाली आहे.