परिचारिका असल्याचे सांगत नवजात अर्भकाचे केलं अपहरण, पोलिसांनी सहा तासात लावला छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 05:08 PM2022-09-22T17:08:15+5:302022-09-22T17:20:04+5:30
‘वजन करण्यासाठी घेऊन जाते’ असे सांगून नवजात अर्भक हातात घेऊन निघून गेली. अर्धा तास झाला तरीही ती परतच आली नाही
अथणी : अथणी येथील शासकीय रुग्णालयातून परिचारिका असल्याचे भासवत महिलेने नवजात अर्भकाचे अपहरण केले. बुधवार दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. हा प्रकार उघडकीस येताच अथणी पोलिसांनी तत्काळ यंत्रणा राबवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या सहा तासांमध्ये अर्भकाची सुटका करुन त्यास मातेच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मालाश्री ऊर्फ ऐश्वर्या कांबळे (रा. म्हैसाळ ता. मिरज सध्या रा. अथणी) या महिलेस अटक करण्यात आली आहे.
ऐनापूर येथील अंबिका भोई या प्रसूतीसाठी अथणीच्या शासकीय दाखल झाली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता त्यांची प्रसूती होऊन मुलगा झाला. यानंतर काही वेळातच एक महिला आपण परिचारिका असल्याचे भासवत अंबिका यांच्याजवळ आली. ‘वजन करण्यासाठी घेऊन जाते ’ असे सांगून ती नवजात अर्भक हातात घेऊन निघून गेली.
अर्धा तास झाला तरीही ती न परतल्याने अंबिका यांना संशय आला. त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांचे पती अमित भोई यांनी अथणी पोलिसांना माहिती दिली. तत्काळ पथक रुग्णालयात धावले. यावेळी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्हीमध्ये एक महिला अर्भकासह निघून जाताना कैद झाली होती. या आधारे तपासाला गती देत पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये मालाश्री ऊर्फ ऐश्वर्या कांबळे हिला अर्भकासह म्हैसाळ येथून ताब्यात घेतले. बाळाची सुखरुप सुटका करुन त्यास मातेच्या स्वाधीन केले.
जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील व कायदा व सुव्यवस्था उपमहासंचालक अलोक कुमार यांनी या कामगिरीबद्दल पथकास वीस हजार रुपये बक्षीस जाहीर केले. डीएसपी विश्वनाथ जलदे, रवींद्र नायकवडी, पीएसआय शंकर मुखर्जी, प्रवीण कुमार यांनी ही कामगिरी केली.