सांगली: मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयावरून जतमध्ये महिलेस डांबून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:38 PM2022-09-30T13:38:20+5:302022-09-30T13:39:59+5:30
जत तालुक्यात मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत असल्याचे संदेश व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जत : मुले पळवून नेणाऱ्या टोळीच्या संशयावरून महिलेला डांबून ठेवण्याची घटना जत येथील विठ्ठलनगर (ताड वस्ती) येथे गुरुवारी घडली. गेल्या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जतमधील ताडवस्ती येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजता एक महिला मुलांना घेऊन जात असताना दिसून आली. तिला काही महिलांनी पकडून ठेवले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या महिलेकडे चौकशी केली. ही महिला शेगाव (ता. जत) येथील होती. ती भंगार गोळा करत असताना तेथील चार महिलांनी तिला पकडून मारहाण केली. तसेच ती मुले पळवून नेणाऱ्या टोळीतील असल्याचे समजून डांबून ठेवल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंद करण्यात आला. त्यानुसार जत पोलिसांनी अज्ञात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार गणेश संकपाळ गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
जत तालुक्यात मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत असल्याचे संदेश व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांच्या दफ्तरी तशी कोणतीही नोंद नाही. शाळेत आलेल्या मुलांना न्यायला अनोळखी व्यक्ती किंवा महिला आल्यास संबंधित शाळांनी पालकांना दूरध्वनी करून त्या व्यक्तीची खात्री करावी. मगच मुलांना त्यांच्याकडे सोपवावे. शाळा, शेतामध्ये, गावामध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती फिरत असल्यास तत्काळ पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा. संशयास्पद व्यक्तीस मारहाण करू नये, कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जत पोलिसांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी साधूंना मारहाण
पंधरा दिवसांपूर्वी जत तालुक्यातील लवंगा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून उत्तर प्रदेशमधील चार साधूंना मारहाण करण्यात आली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी सहा जणांना अटकही केली होती. पंधरवड्यात तालुक्यात दुसरी घटना घडल्याने भीतीचे वातावरण आहे.