तासगावातील तरुण व्यावसायिकाची सावकारी छळामुळे आत्महत्या
By संतोष भिसे | Published: January 12, 2024 05:19 PM2024-01-12T17:19:30+5:302024-01-12T17:19:37+5:30
दुचाकीसह टीव्ही काढून नेला, चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी, पत्नीने दिली फिर्याद, चौघांना अटक
सांगली : तासगाव येथील सचिन गौरीहर माळी (रा. माळी गल्ली) तरुण व्यावसायिकाने सावकारांच्या छळाला कंटाळून सांगलीत आत्महत्या केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अनुराधा हॉटेलच्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. याप्रकरणी तासगावमधील चौघा खासगी सावकारांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन यांची पत्नी सीमा यांनी पोलिसांत फिर्याद दिली. अमोल सुरेश बेले (रा. खानापूर वस्ती, तासगाव), योगेश संजय बेले (रा. डबास गल्ली, तासगाव), अमोल जगन्नाथ यादव (रा. माळी गल्ली, तासगाव) आणि गजानन घाडगे (रा. ढवळ वेस, तासगाव) अशी संशयित खासगी सावकारांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
व्याजाने घेतलेल्या पैशांवर चौघा संशयितांनी चक्रवाढ पद्धतीने अवाजवी व्याज आकारणी केली. वसुलीसाठी सचिन यांचा शारीरिक व मानसिक छळ केला, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सीमा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांनी सचिन यांच्याकडूच्मुद्दल व व्याजापोटी ४ लाख ७० हजार रुपये वसुल केले. घरातील ४० हजार रुपये किंमतीचा नवा टीव्ही संच काढून नेला. १ लाख १५ हजार रुपये किंमतीची दुचाकीही जबरदस्तीने ओढून नेली. हा छळ सहन न झाल्याने सचिन यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. मंगळवारी (दि. ९) रात्री सव्वाआठपूर्वी अनुराधा हॉटेलच्या खोली क्रमांक मध्ये गळफास घेतला. पोलिसांनी चौघा संशयितांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
सचिन माळी यांनी व्यावसायिक कारणासाठी काही महिन्यापूर्वी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ठरल्याप्रमाणे सर्व रकमेची परतफेडही केली. त्यानंतरही त्यांनी आणखी पैशांसाठी तगादा लावला होता. चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करुन ४ लाख ७० हजार रुपयांची बेकायदा वसुली केली.
टीव्ही, दुचाकी काढून नेली
अमोल बेले याने सचिन यांच्या घरात जबरदस्तीने घुसून टीव्ही काढून नेला. योगेश बेले याच्याकडून सचिन यांनी ४० हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात योगेशने सचिन यांची नवीकोरी दुचाकी (एमएच १० डीडी २२१८) जबरदस्तीने स्वत: च्या नावावर करुन घेतली. यानंतरही वसुलीचा तगादा थांबलेला नव्हता. सचिन यांना व्यवसायाच्या ठिकाणी वारंवार जाऊन शिवीगाळ, दमदाटी केली जात होती. जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. याला कंटाळून सचिन माळी यांनी आत्महत्या केल्याची सीमा यांची तक्रार आहे.