Sangli: आंब्याच्या मोहात गमावला जीव, इस्लामपुरात तरुण सलून व्यावसायिकाचा मृत्यू
By संतोष भिसे | Published: April 22, 2024 03:44 PM2024-04-22T15:44:17+5:302024-04-22T15:44:48+5:30
आंबा पाडताना पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बसला विजेचा धक्का
मानाजी धुमाळ
रेठरे धरण : झाडावरील आंबा काढण्याच्या मोहात ओझर्डे (ता. वाळवा) येथील तरुण सलून व्यावसायिक निलेश निवास कदम (वय २५) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. इस्लामपूर शहरात ही दुर्घटना घडली.
निलेश हे इस्लामपुरात कन्या महाविद्यालय रस्त्यावर चार वर्षांपासून सलून व्यवसाय करीत होते. इस्लामपुरातच किसान नगर परिसरात आई-वडिलांसोबत राहण्यास होते. त्यांच्या घराला खेटूनच आंब्याचे झाड आहे. १३ एप्रिलरोजी दुपारी तीन वाजता घराच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीत उभा राहून आंबे काढत होते. त्यासाठी लोखंडी पाईप वापरत होते.
आंबा पाडत असताना पाईपचा स्पर्श विद्युत तारेला झाला. त्यामुळे त्यांना जोराचा धक्का बसला. धक्क्याने गॅलरीत खाली पडले. गंभीर अवस्थेत उपचारांसाठी कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विजेच्या धक्क्याने त्यांचे शरीर ७० टक्के भाजले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ आहे. मनमिळावू स्वभावाच्या निलेशच्या निधनाने ओझर्डेसह इस्लामपुरच्या किसाननगर परिसरात शोककळा पसरली.