मोटारीच्या धडकेत शिराळ्याच्या तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरात वनरक्षक पदाची परीक्षा देऊन परतताना झाला अपघात
By संतोष भिसे | Published: February 26, 2024 04:49 PM2024-02-26T16:49:47+5:302024-02-26T16:51:37+5:30
शिराळा : येथील विकर्ण नंदकुमार मस्कर (वय २३, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, शिराळा) या युवकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू ...
शिराळा : येथील विकर्ण नंदकुमार मस्कर (वय २३, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, शिराळा) या युवकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. किणी वाठार (जि. कोल्हापूर) येथे रविवारी (दि. २५) हा अपघात झाला.
कोल्हापूरात वनरक्षक पदाची शारीरिक चाचणी परीक्षा देऊन विकर्ण शिराळ्याकडे दुचाकीवरुन येत होता. त्यावेळी त्याला मोटारीने (एमएच १३ ईसी ३०६३) मागून जोराची धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकर्ण वनरक्षक पदाच्या लेखी परीक्षेत नुकताच उत्तीर्ण झाला होता. रविवारी सकाळी लवकर शारीरिक चाचणी परीक्षा होती.
त्यामुळे दुचाकीवरून (एमएच १० सीई ६६५७) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरला गेला होता. परीक्षा देऊन परतताना अपघात झाला. मोटार कोल्हापूरहून भरधाव येत होती. तिच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विकर्णचा रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
मृतदेहावर सोमवारी पहाटे शिराळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी मोटार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. विकर्णच्या पश्चात आई, चार बहिणी, चुलते, चुलती असा परिवार आहे.