सांगलीत महाविद्यालयात घुसून तरुणावर खुनी हल्ला, कॉलेज कॉर्नर चौकात फाळकूट दादांची दादागिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 02:39 PM2022-08-03T14:39:22+5:302022-08-03T14:39:22+5:30
तरुण गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला
सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयात भावाला मारहाण केल्याचा राग मनात धरून एनएसएस खोलीत घुसून तरुणावर शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अभिषेक अजित कांबळे (वय १९, रा. खोतवाडी, ता. मिरज) याने सुजित राम शिंदे (रा. शंभर फुटी रोड, झुलेलाल चौक, सांगली) व आदित्य खांडेकर (रा. गुंडेवाडी, ता. मिरज) या दोघांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. कॉलेज कॉर्नर परिसरात अनेक महाविद्यालये असून, यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या संशयिताच्या भावाला अभिषेक कांबळे याने मारहाण केली होती. याचा राग मनात धरून मंगळवारी दुपारी संशयित एकमेकांना महाविद्यालयात भिडले. याच दरम्यान संशयितांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या धारदार शस्त्राने कांबळे याच्यावर वार केले. यात कांबळे हा गंभीर जखमी झाला. कांबळे गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कॉलेज परिसरात एकच धावपळ उडाली होती. महाविद्यालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर विश्रामबाग पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक महाविद्यालयात दाखल झाले. विश्रामबागचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंडे, एलसीबीचे रूपेश होळकर, राेहित आदीच्या पथकाने पसार झालेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कॉलेज कॉर्नर बनलाय अशांत
शहरातील पाचहून अधिक महाविद्यालये एकत्र असलेल्या कॉलेज कॉर्नर चौकात आता फाळकूट दादांची चांगलीच दादागिरी सुरू असते. रस्त्यावर दुचाकी लावून एकमेकांकडे बघून शिवीगाळ, मुलींना अपशब्द वापरण्याचेही प्रकार वाढले आहेत. त्यातूनच थेट महाविद्यालयात घुसून खुनी हल्ल्याची घटना मंगळवारी घडली.