मंदिराच्या कार्यालयात घुसून तरुणाचा भोसकून खून, हल्लेखोरांचा शोध सुरु; सांगलीतील आरेवाडीतमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 04:12 PM2022-11-23T16:12:39+5:302022-11-23T16:13:58+5:30
मृत मारुती हा पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांचा मुलगा आहे.
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा मंदिर देवस्थानच्या देणगी कार्यालयात घुसून मारुती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर (वय ३०, रा. आरेवाडी) या तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. मंदिरासमोर असलेल्या देणगी कार्यालयास आतून कडी लावत चौघा हल्लेखोरांनी मारुतीवर हल्ला केला. ही घटना मंगळवार, दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजता घडली. मृत मारुती हा पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांचा मुलगा आहे.
अनिल श्रीरंग कोळेकर (वय ३५), संजय श्रीरंग कोळेकर (३०), सोमनाथ श्रीरंग कोळेकर (२८) व बंडू दामाजी कोळेकर (२२, सर्व रा. आरेवाडी) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. घटनेनंतर सर्वजण पसार झाले आहेत.
याबाबत कवठेमहांकाळ पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारमुळे आरेवाडीच्या बिरोबा मंदिर परिसरात गर्दी होती. बनात आलेला मारुती देवस्थान समितीच्या कार्यालयात येऊन बसला होता. त्यावेळी अनिल कोळेकर, संजय कोळेकर, सोमनाथ कोळेकर व बंडू कोळेकर हे चौघे तेथे आले. देणगी कार्यालयात शिरून त्यांनी आतून दाराची कडी लावून घेतली.
मारुतीला काही कळण्यापूर्वीच त्याच्यावर सपासप वार सुरू केले. पोटात खोलवर वार झाल्याने रक्तबंबाळ होऊन मारुती निपचित पडला. यानंतर चौघाही हल्लेखोरांनी देणगी कक्षातून बाहेर येऊन पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मारुतीला तत्काळ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. चौकशीदरम्यान चौघाही हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली. सर्व आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. लवकरच त्यांना अटक करू. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेनंतर आरेवाडी व बिरोबा मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.