कर्जमुक्ती योजनेंतर्गत म्हैसाळ व बनपुरी येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:59 PM2020-02-26T14:59:07+5:302020-02-26T15:00:26+5:30
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील म्हैसाळ येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 90 हजार 107 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सांगली : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील म्हैसाळ येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 90 हजार 107 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ आणि आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले. म्हैसाळ येथील वसंत विकास सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपनिबंधक मिरज आदीनाथ दगडे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यात म्हैसाळ आणि बनपुरी येथील आधार प्रमाणिकरणाचे कामाचा पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. म्हैसाळ येथील 375 व बनपुरी येथील 221 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक यांनी आधार प्रमाणिकरणाच्या कामाची पाहणी केली तसेच आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करून जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 90 हजार 107 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 528 कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील.
या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून 28 तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही ते म्हणाले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्जमाफीमुळे दिलासा - संजय बापू पाटील
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे माझे 1 लाख 53 हजार 551 रूपयांचे कर्ज माफ होवून यामुळे दिलासा मिळाला असल्याचे समाधान म्हैसाळ येथील शेतकरी संजय बापू पाटील यांनी आधार प्रमाणीकरणानंतर व्यक्त केले. आजारपणामुळे द्राक्ष बागेकडे लक्ष देता न आल्याने वसंत विकास सोसायटी लि. म्हैसाळ कडील 1 लाख 53 हजार 551 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले असताना शासनाच्या या कर्जमुक्तीमुळे कुटुंबाला दिलासा मिळाला असून हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समारंभास उपनिबंधक मिरज आदिनाथ दगडे, वसंत विकास सोसायटीचे चेअरमन धनराज शिंदे, सचिव भरत माळी, ग्रामपंचायत सदस्य दौलत शिंदे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.